लातूर : मांजरा प्रकल्पावरील ट्रान्सफॉर्मर दुरूस्त करणाऱ्या एऩदत्ता एजन्सीने ४२ लाख रुपयांचे बिल थकल्यामुळे स्वीच बोर्डाला लॉक करून पाणीपुरवठा बंद करण्याचा प्रयत्न केला़ दरम्यान, मनपा कर्मचाऱ्यांनी तात्काळ लॉक तोडून पाणीपुरवठा पूर्ववत सुरू केला़ एखाद्या एजन्सीने थकीत बिलाच्या वसुलीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेला धारेवर धरण्याची ही पहिलीच वेळ आहे़२०१६ च्या उन्हाळ्यात लातूर शहरात अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली होती़ मांजरा प्रकल्प कोरडा पडल्याने पाणीपुरवठा बंद होता़ या कालावधीत मनपा प्रशासनाचे प्रकल्पावरील मालमत्तेच्या देखरेखीकडे दुर्लक्ष झाले़ परिणामी, ट्रान्सफॉर्मरची चोरी झाली होती़ त्यानंतर चांगला पाऊस झाला आणि प्रकल्पात पाणी आले़ त्यावेळी पंप सुरू करताना ट्रान्सफॉर्मरची चोरी झाल्याचे उघडकीस आले होते़ नव्या ट्रान्सफॉर्मर बसविण्याची आणि त्याच्या दुरूस्तीची जबाबदारी निविदा काढून एऩदत्ता एजन्सीला देण्यात आली़ ४२ लाख रुपयांत हे काम एऩदत्ता एजन्सीला देण्यात आले़ मात्र मनपाची आर्थिक स्थिती बिकट असल्याने एजन्सीचे बिल थकले़ त्यामुळे एजन्सीच्या संचालकांनी गुरूवारी मांजरा प्रकल्पावरील ट्रान्सफॉर्मरच्या स्वीच बोर्डाला लॉक करून पाणीपुरवठा बंद करण्याचा प्रयत्न केला़ ही घटना मनपा कर्मचाऱ्यांना समजताच त्यांनी प्रकल्पावरील स्वीच बोर्डाचे लॉक तोडून पंप सुरू करून पाणीपुरवठा पूर्ववत केला़ ठेकेदारासोबत केलेल्या करारनाम्यानुसार निधीची उपलब्धता झाल्यास देयके देण्याचे मनपाने मान्य केले होते़ मात्र अचानक एजन्सीकडून देयकाच्या वसुलीसाठी स्वीच बोर्डालाच लॉक करून पाणीपुरवठा बंद केला़ या कृतीची मनपा प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, ठेकेदारावर योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत़
ठेकेदाराकडून स्वीच बोर्डाला लॉक; पाणीपुरवठ्यात व्यत्यय
By admin | Published: May 04, 2017 11:34 PM