औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नवीन पाणीपुरवठा योजनेचे १२ डिसेंबर रोजी भूमिपूजन करण्यात आले. पाणीपुरवठा योजनेचे काम करणाऱ्या हैदराबाद येथील कंपनीने अद्याप महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे बँक गॅरंटी जमा केलेली नाही. त्यामुळे काम सुरू होण्यास आणखी एक महिना लागण्याची शक्यता आहे.
शहराची तहान भागविण्यासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. १६८० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम हैदराबाद येथील जीव्हीपीआर या कंपनीला ९.९ टक्के जास्त दराने देण्यात आले आहे. या कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते औरंगाबादेत मोठ्या थाटात करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने कंत्राटदार कंपनीला बँक गॅरंटीपोटी २६ कोटी रुपये भरण्याचे आदेश दिले. २० डिसेंबरपर्यंत बँक गॅरंटी भरणे अपेक्षित होते. मात्र, कंत्राटदाराने अद्यापही बँक गॅरंटी भरलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार कंत्राटदार संभ्रमावस्थेत आहे. त्यामुळे उशीर होत आहे. अद्याप कंपनीने औरंगाबाद शहरात कार्यालय सुरू करण्यासाठीच्या हालचाली देखील सुरू केलेल्या नाहीत. त्यामुळे योजनेचे काम प्रत्यक्ष केव्हा सुरू होईल, याविषयी देखील साशंकता व्यक्त केली जात आहे.
चार दिवसांत बँक गॅरंटी भरणारकंपनीने बँक गॅरंटी भरण्यासाठी मुदतवाढीची मागणी केली होती. ख्रिसमसनंतर नवीन वर्षात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बँक गॅरंटी भरू, असे पत्र कंपनीने दिले आहे. त्यामुळे कंपनीला बँक गॅरंटी भरण्यासाठी अवधी दिला असून, आगामी चार दिवसांत कंपनी प्रक्रिया पूर्ण करेल.- अजयसिंह, अधीक्षक अभियंता, एमजेपी.