वाळूजमहानगर : बँकेतून कामगारांच्या वेतनासाठी काढलेली पावणेतीन लाख रुपयांची रोकड दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी लांबविल्याची घटना मंगळवारी दुपारी वाळूज औद्योगिक क्षेत्रात घडली.मकसूद शाह (रा. मुज्जफ्फरनगर. एन-१३,औरंगाबाद) हे कामगार ठेकेदार आहेत. मंगळवारीदुपारी २ वाजेच्या सुमारास शाह यांनी कामगारांचे वेतन काढण्यासाठी बजाजनगरातील मोरे चौकात भारतीय स्टेट बँके मधून २ लाख ८० हजार रुपये काढून ही बॅग कापडाच्या पिशवीत ठेवली होती. यानंतर ते आपल्या साडूची मुलगी उजमा (११) हिला दुचाकीवर बसवून रांजणगावातील समतानगरात असलेल्या आपल्या कार्यालयाकडे चालले होते. महाराणा प्रताप चौकाच्या पुढे मागून काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्या नवीन पांढरा शर्ट घातलेल्या २० ते २५ वयोगटातील भामट्याने उजमाच्या हातामधील पैसे असलेली बॅग हिसकावली व ते सुसाट वेगाने रांजणगावाच्या दिशेने गेले. उजमाने आरडाओरडा करून बॅग पळविल्याचे शाह यांना सांगितले. शाह यांनी भामट्यांचा पाठलाग केला. मात्र ते पळून जाण्यात यशस्वी ठरले. शाह यांनी एमआयडीसी वाळूज ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी परिसरात नाकाबंदी करून परिसर पिंजून काढला. गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त बाबासाहेब मुसळे, छावणीचे सहायक आयुक्त गायकवाड, गुन्हे शाखेचे कर्मचारी, पोलीस निरीक्षक रामेश्वर थोरात आदींनी ही कामगीरी केली.
ठेकेदाराची पावणेतीन लाखांची बॅग लांबविली
By admin | Published: July 15, 2015 12:28 AM