छत्रपती संभाजीनगर : सोमवारी (दि. ४ सप्टेंबर) चितेगाव टोलनाक्याजवळ १४०० मि. मी. व्यासाची जलवाहिनी पुन्हा फुटली. परिणामी शहराचा पाणी पुरवठा पुन्हा एक दिवस पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मनपा अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, सहा दिवसांपूर्वीच जायकवाडी गावाजवळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कंत्राटदाराकडूनच ७०० मि. मी. व्यासाची जलवाहिनी फुटली होती. तिच्या दुरुस्तीसाठी दोन दिवस लागल्याने शहराचा पाणी पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला होता. सोमवारी दुपारी पुन्हा कंत्राटदाराकडूनच तिसऱ्यांदा पैठण रोडवरील टोलनाक्याजवळ १४०० मि. मी. व्यासाची जलवाहिनी फुटली. यामुळे १०० फूट उंच पाण्याचे फवारे उडत होते. बराचवेळ वाहतूकही विस्कळीत झाली होती. सायंकाळी दुरुस्तीचे काम सुरू केले. शहराचा पाणी पुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आल्याचे मनपाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले. रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते.
सातव्या-आठव्या दिवशी शहराचा पाणी पुरवठा बंद राहिल्यामुळे सिडको-हडको, मुकुंदवाडी, चिकलठाणा, शिवाजीनगर, पुंडलिकनगर, पडेगाव, मिटमिटा, बेगमपुरा, ज्युबिली पार्क, पहाडसिंगपुरा, विद्यापीठ, टाऊन हॉल, शहागंज, कटकटगेट, रोषणगेट आदी भागाला निर्जळीचा सामना करावा लागेल. शहराचा पाणी पुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आल्याचे मनपाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सिडको-हडको भागासह शहराच्या अनेक वसाहतींना सातव्या, आठव्या दिवशी पाणी मिळत आहे. सध्या सणासुदीचे दिवस आहेत. त्यातच चार दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.