औरंगाबाद : मंत्रिमंडळ बैठकीनिमित्त सार्वजनिक बांधकाम विभागाने सुभेदारी विश्रामगृहाच्या दुरुस्तीचे काम लेबर रेटवर करून घेण्यास सुरुवात केल्यामुळे अनेक सुशिक्षित बेरोजगार अभियंते आणि कंत्राटदार संघटनांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. कंत्राटदार हे स्थानिक राजकीय नेत्यांकडे आपले गाऱ्हाणे मांडत असून, याप्रकरणी कंत्राटदार बांधकाममंत्र्यांना भेटणार आहेत. शुक्रवारी खा.चंद्रकांत खैरे यांच्याकडे कंत्राटदार संघटनेने याप्रकरणी तक्रार केली. कामे देताना मनमानी होत असल्याची भावना कंत्राटदार संघटनेने व्यक्त केली असून, मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे या विभागात सुरू असलेल्या अनागोंदीची तक्रार कंत्राटदार संघटना करणार आहे. दरम्यान, खा.खैरे यांनी शुक्रवारी मुख्य अभियंत्यांना बोलावून त्यांची कानउघाडणी केली. या बैठकीत काही अभियंत्यांच्या बदल्यांची मागणी करण्यात येणार आहे. विभागातील कर्मचाऱ्यांबाबतदेखील दुजाभाव केला जात असल्याचा आरोप कंत्राटदार करीत आहेत. याप्रकरणी संघटनेची बैठक झाली आहे. विभागाने कंत्राट न काढता सुभेदारीच्या रंगरंगोटीचे काम २६ सप्टेंबरपासून युद्धपातळीवर सुरू केले आहे. बांधकाम विभागाची नियमावली बाजूला ठेवून हे काम करण्यात येत आहे. यामध्ये एकाही स्थानिक कंत्राटदाराला काम मिळाले नाही. शिवाय इमारत व उद्यान विभागाच्या अभियंत्यांनादेखील यापासून दूर ठेवण्यात आले. ऐन दिवाळीच्या तोंडावर कामे मिळाली नाहीत. त्यामुळे अनेकांच्या ‘टक्केवारी’चे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे आजवर बांधकाम विभागाकडे कोट्यवधींची बिले थकीत असताना जे काम रोख होणार होते. तेच काम विभागाने न दिल्यामुळे कंत्राटदारांचा तीळपापड झाला आहे. बांधकाम विभागाची कामे घेण्यात ज्यांची मक्तेदारी आहे, अशा कंत्राटदारांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे.
काम न मिळाल्यामुळे कंत्राटदारांचा तीळपापड
By admin | Published: October 03, 2016 12:41 AM