लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शारीरिक व्यंगामुळे दिव्यांगांशी विवाह करण्यास सहसा कोणी धजावत नाही. मात्र, त्यांना जीवनसाथी म्हणून निवडणाऱ्या ४६ सुदृढ व्यक्तींचे प्रस्ताव जिल्हा परिषदेने मंजूर केले असून त्यांना लवकरच प्रत्येकी ५० हजार रुपये अनुदान मिळणार आहे. अनुदानासाठी जि.प. कडे एकूण ८६ प्रस्ताव आले होते. त्यापैकी ४० प्रस्ताव अपात्र ठरले आहेत.दिव्यांगांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्याशी विवाह करणाऱ्या सदृढ व्यक्तीस जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून प्रोत्साहन अनुदान देण्याची योजना आहे. पूर्वी केवळ २० हजार रुपये अनुदान दिले जात असे. मात्र, २०१४ नंतर त्यात ३० हजार रुपयांची वाढ करण्यात आली. १ एप्रिल २०१४ नंतर सुदृढ व्यक्तींनी दिव्यांगांशी विवाह करणाऱ्या तरुण- तरुणीला ५० हजार रुपये अनुदान दिले जाते. गतवर्षी २३ जणांना याचा लाभ दिला होता. २०१६ - १७ या वर्षासाठी २२ लाख रुपये अनुदान मंजूर झाले होते. मागील वर्षीच्या शिल्लक अनुदान रक्कमेतून १ लाख रुपये व या वर्षीचे २२ लाख रुपये असे एकूण २३ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.अस्थिव्यंग, कर्णबधीर, मूकबधीर व अंध असे व्यंग असलेल्यांनाही आयुष्यभरासाठी स्वीकारण्यात आले आहे. अस्थिव्यंग जोडीदार स्वीकारणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे समाजकल्याण अधिकारी रवींद्र तुरूकमारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.खाते क्रमांक कळवावेतप्रोत्साहन अनुदानासाठी पात्र लाभार्थ्यांची यादी जि.प. समाजकल्याण विभागात डकवली आहे. लाभार्थ्यांनी सुदृढ व दिव्यांग असे दोघांच्या नावे राष्ट्रीयीकृत बँकेत संयुक्त खाते उघडणे आवश्यक आहे. खाते क्रमांकाच्या साक्षांकित प्रती समाजकल्याण विभागाकडे जमा कराव्यात असे आवाहन वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता पी. एम. लांडे यांनी केले आहे.
दिव्यांग जोडीदार निवडणाऱ्या ४६ जणांना जि.प.कडून प्रोत्साहन अनुदान
By admin | Published: May 08, 2017 11:27 PM