- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : महापालिका, आरोग्य अधिकारी स्वॅब घेतल्यानंतर संशयितांना संस्थात्मक क्वारंटाईन करणे बंधनकारक असल्याचे सांगतात. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून खाजगी प्रयोगशाळा स्वॅब घेतल्यानंतर संशयितांना घरी पाठवीत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार कोरोनावाढीला हातभार लावणारा ठरत आहे; परंतु त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
शहरात ४ खाजगी प्रयोगशाळांना मनपाकडून स्वॅब तपासणीची परवानगी देण्यात आलेली आहे. औरंगाबादेत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही संख्या का वाढत आहे, याचे उत्तर शोधण्यात आणि ही वाढ रोखण्यास प्रशासन, आरोग्य यंत्रणा अपयशी ठरत आहे. पॉझिटिव्ह रुग्णांत वाढ होऊ नये म्हणून प्रत्येक संशयित रुग्णास संस्थात्मक क्वारंटाईन करण्याची सूचना आहे; परंतु हा नियम केवळ घाटी आणि मनपाकडे तपासणी करणाऱ्यांसाठीच लागू आहे का. कारण खाजगी प्रयोगशाळा स्वॅब घेतल्यानंतर संशयिताना सरळ घरी सोडत आहेत. संशयित रुग्णांस संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा नियम त्यांच्यासाठी नाही का. असेलही; पण ते नियमांची अंमलबजावणी करताना दिसून येत नाही. त्यामुळे संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये राहणे नको म्हणून अनेकांनी स्वॅब तपासणीसाठी खाजगी प्रयोगशाळेचा रस्ता धरला. हा प्रकार कोरोनाचा प्रसार होण्यासाठी हातभार लावणारा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
संस्थात्मक क्वारंटाईनची सूचनाशहरात ४ खाजगी प्रयोगशाळा आहेत. त्यांच्याकडून आता घरी जाऊन स्वॅब घेतले जात नाही. ज्या डॉक्टरने संदर्भित (रेफर) केले, त्यांच्या रुग्णालयात स्वॅब घेतला जातो. पूर्वी त्यांच्याकडून संशयिताना होम क्वारंटाईन केले जात होते. आता संस्थात्मक क्वारंटाईन करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्याची सुरुवात होईल, असे मनपाच्या डॉ. मेघा जोगदंड यांनी सांगितले आहे.
शुल्क आकारणीही अधिकप्रयोगशाळेत थेट तपासणीसाठी जाणाऱ्यांकडून २८०० रुपये शुल्क न आकारता त्यांच्याकडून २५०० रुपये शुल्क घ्यावे, असा निर्णय काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने घेतला. मात्र, तेथे अद्यापही २८०० रुपयेच आकारण्यात येत आहेत.
1,281 स्वॅब तपासणी, 117 पॉझिटिव्हशहरात २३ जूनपर्यंत खाजगी प्रयोगशाळांमध्ये १ हजार २८१ स्वॅबची तपासणी करण्यात आली. यातील ११७ संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. हे पॉझिटिव्ह रुग्ण स्वॅब देण्यासाठी गेले. त्यानंतर परत घरी आणि अहवाल आल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात गेले असतील, तर या सगळ्यात अन्य लोकांना बाधा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.
स्वॅब देऊन घरी जाता येईल...‘लोकमत’ प्रतिनिधीने बुधवारी एका खाजगी प्रयोगशाळेशी संपर्क साधला. स्वॅब तपासणी करायची असल्याचे सांगितले. तेव्हा प्रयोगशाळेच्या व्यक्तीने एका रुग्णालयात यावे लागेल. डॉक्टर तपासणी करतील. त्यानंतर स्वॅब घेतला जाईल. त्यासाठी २८०० रुपये लागतील, असे सांगितले. स्वॅब घेतल्यानंतर घरी जावे लागेल की, रुग्णालयात थांबावे लागेल, अशी विचारणा केली असता घरी जाता येईल, असे सांगितले. उद्या या, परवापासून नवीन नियम लागू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.