लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जीएसटीमधील काही तरतुदींचा व्यवसायावर होणारा विपरीत परिणाम, वाढत्या डिझेलच्या किमती, आरटीओ व पोलीस विभागाकडून होणारी अडवणूक या विरोधात आॅल इंडिया मोटार काँग्रेसने ९ व १० आॅक्टोबरला संप पुकारला आहे. या संपाला औरंगाबाद मालवाहतूकदार संघटनेने पाठिंबा दिला आहे.संघटनेचे अध्यक्ष फैय्याज खान यांनी सांगितले की, जिल्ह्यात लहान-मोठे ४५६ ट्रान्सपोर्ट आहेत. सुमारे साडेतीन हजार टेम्पो, ट्रक आहेत. मालवाहतूकदारांच्या विविध मागण्यांसाठी आॅल इंडिया मोटार काँग्रेसने देशव्यापी संप पुकारला आहे. या संपात जिल्ह्यातील सर्व व्यावसायिक सहभागी होणार आहे. नोटाबंदी त्यानंतर जीएसटी यामुळे उद्योग-व्यवसायाची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. त्याचा परिणाम, मालवाहतुकीवर झाला आहे. जीएसटीतील जाचक नियमामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. ट्रक आणि वाहतूकदारांची सक्तीने नोंदणी आणि अनावश्यक अनुपालन करण्यात येत आहे. कोणतेही कारण नसताना रस्त्यावर आरटीओचे अधिकारी व पोलीस नाहक त्रास देत आहेत. अधिकाºयांच्या भ्रष्टाचाराविरोधात सर्व मालवाहतूकदार संघटना एकत्र आल्या आहेत. दररोज डिझेलचे भाव वाढत असल्याने उद्योगक्षेत्राशी वर्षभराचा करार केलेले वाहतूकदार कर्जबाजारी झाले आहेत. डिझेल भाववाढ थांबवावी, यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. शहरात दररोज परजिल्हा व परराज्यातील दीड ते दोन हजार मालट्रक येत असतात शिवाय जिल्ह्यातील मालट्रक असे चार ते पाच हजार मालट्रक दोन दिवस शहरात थांबतील.
मालवाहतूकदार संघटनेचा संपात सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2017 12:43 AM