औरंगाबाद : आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुयायी आहोत. पुण्यात मनोज गरबडे व कार्यकर्त्यांनी गनिमीकाव्याची पहिली झलक दाखवली आहे. दुसरी झलक पाहायची नसेल, तर सत्तेत असलेल्या वाचाळवीरांना आवारा. यापुढे कोणी महापुरुषांचा अवमान करणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी आमचा निरोप सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचवा, अशी मागणी आंबेडकरवादी अत्याचार विरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांकडे केली.
सोमवारी १९ डिसेंबर रोजी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास भडकलगेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून आंबेडकरवादी अत्याचार विरोधी कृती समितीचा नियोजित इशारा मोर्चा विभागीय आयुक्तालयाच्या दिशेने निघाला. या पूर्वनियोजित मोर्चात शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्ते, महिला, पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चाचे नेतृत्व रमेशभाई खंडागळे, दिनकर ओंकार, प्रकाश निकाळजे, मिलिंद दाभाडे, अरुण बोर्डे, कैलास गायकवाड, गौतम लांडगे, कृष्णा बनकर, गौतम खरात, विजय वाहूळ, अरुण शिरसाठ, राजू साबळे आदींनी केले.
शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. आंबेडकर यांना हीन लेखण्यासाठी अवमानकारक वक्तव्य केले. त्यामुळे सामाजिक भावना दुखावल्या. परिणामी, शहर व ग्रामीण भागातील पोलिस ठाण्यांमध्ये त्यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यान्वये तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. आठ दिवस होत आले; पण कुठेही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. तो त्वरित दाखल करण्याचे निर्देश पोलिसांना द्यावेत, याकडे शिष्टमंडळाने सुनील केंद्रेकर यांचे लक्ष वेधले.
मोर्चात बंडू कांबळे, नाना म्हस्के, राहुल साळवे, आनंद कस्तुरे, चेतन कांबळे, जयप्रकाश नारनवरे, राहुल सोनवणे, लक्ष्मण हिवराळे, प्रवीण जाधव, सतीश पट्टेकर, अशोक भातपुडे, डॉ. संदीप जाधव, मनोज वाहूळ, सचिन बोर्डे, कुणाल खरात, विजय निकाळजे, सचिन गंगावणे, पिंटू बोर्डे, रमेश मगरे, अमोल दांडगे, अरविंद कांबळे, नरेश वरठे, प्रदीप इंगळे, विजय शिंदे, सुनील कोतकर, पंकज बनसोडे, कोमल हिवराळे, मंजू लोखंडे, प्रमोद सदाशिवे आदींसह हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.