औरंगाबाद : दुष्काळ, गारपीट, अवकाळी पाऊस आणि कोरोनाचा प्रादुर्भाव अशा विविध संकटांचा सामना करत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता रासायनिक खताचे भाव वाढल्याने आर्थिक संकट निर्माण झाले आहे. कृषिसेवा केंद्र व काही व्यापारी संगनमताने जुन्या खतांचा साठा करून वाढीव दराने विकून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करत आहे. प्रशासनाने रासायनिक खताच्या भाववाढीवर नियंत्रण ठेवावे, तसेच कृत्रिम भाववाढ करणाऱ्यावर कार्यवाही करण्याची मागणी खा.इम्तियाज जलील यांनी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे.
जिल्हास्तरीय हंगामपूर्व आढावा बैठकीत खा.इम्तियाज जलील यांनी शेतकऱ्यांना वीज कनेक्शन कोटेशन भरूनही मिळत नाही. महावितरणकडून ७० टक्के शेतकऱ्यांची होणारी अडवणूक थांबविण्याची, तसेच सीएसआर निधीतून बियाणे व खते मोफत द्यावे, कृषी उत्पन्न बाजार समित्या उघडणे, मालाला हमीभाव द्यावा, नगर नाशिक जिल्ह्यातील कारखान्यात अडकलेले देयके तत्काळ मिळावे, पीक विम्याची रक्कम, रोहित्र दुरुस्ती, विहीर व शेततळ्यांची रखडलेली मान्यता, नवीन कांदा मार्केट आणि शैक्षणिक शुल्क माफ करण्यासाठी त्वरित कार्यवाही करण्याची मागणी केली. पालकमंत्री देसाई यांच्यासह विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा कृषी अधिकारी तुकाराम मोटे यांचेही कृषिविषयक अडचणींकडे त्यांनी लक्ष वेधून कारवाईची करण्याची मागणी केली. कंपनीच्या अधिकाऱ्यांना खताच्या दरवाढीचा जाब विचारला असता, कच्च्या मालाचे भाव वाढल्याने ही दरवाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. यावर केंद्राने लक्ष देण्याची मागणी केली. त्यावेळी आ.हरिभाऊ बागडे यांनी राज्य सरकारनेही भार उचलायला हवा अशी, भूमिका मांडल्याचे खा.इम्तियाज जलील यांनी सांगितले.