औरंगाबाद : पहिल्याच पावसाने महावितरण कंपनीची झोप उडविली. अनेक फीडर बंद पडले, अनेक ठिकाणी ताराही तुटल्या. महावितरणचे अभियंते- कर्मचारी दुरुस्तीसाठी धावले. अशा वेळी उपकेंद्रांमध्ये कोणीच नाही, असा गैरसमज नागरिकांचा झाला. या पार्श्वभूमीवर आजपासून नियंत्रण कक्ष कार्यान्वित केला जाणार असून, तो चोवीस तास कार्यरत असेल.
यासंदर्भात मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी सांगितले की, पावसाळ्यात वीज ग्राहकांच्या तक्रारींचे तात्काळ निरसन करण्यासाठी महावितरण कंपनीने स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या नियंत्रण कक्षात २४ तास कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. सदरचे नियंत्रण कक्ष हे मिलकॉर्नर येथील महावितरणच्या मुख्य कार्यालयात असेल.
गेल्या दोन दिवसांपासून पावसाने शहराला झोडपले. महावितरण कंपनीचे अनेक फीडर बंद पडले, तर कुठे झाडाच्या फांद्या पडून तारा तुटल्या. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी अनेक कर्मचारी, अधिकारी घटनास्थळी धावले. मात्र, दरम्यानच्या काळात नियंत्रण कक्षात कोणीच नव्हते. अशा वेळी ग्राहकांनी सदरच्या संबंधित उपकेंद्रांमध्ये फोन केले.
त्यावेळी अनेकदा फोन उचलण्यात आले नाहीत. शनिवारी पावसामुळे अनेक ठिकाणच्या तुटलेल्या विजेच्या तारा, इन्सुलेटर, कंडक्टर दुरुस्तीच्या कामाला कर्मचारी- अभियंते तिकडे गेले होते. ग्राहकांचा गैरसमज होऊ नये व तक्रारींचे तात्काळ निवारण व्हावे, यासाठी उद्यापासून सुरू करण्यात येणारा नियंत्रण कक्ष चोवीस तास सुरू ठेवला जाणार आहे. यासंदर्भात रविवारी दुपारी महावितरणच्या मुख्यालयात मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.