छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुक दिवसेंदिवस रंगात येत असतानाच दुसरीकडे सोशल मिडियावर वादग्रस्त वक्तव्य करण्याचे प्रमाणही वाढत आहे. शहरात नुकतेच २४ तासात दोन गुन्हे दाखल करण्यात आले. यात पहिला गुन्हा मुकूंदवाडीत मोबीन चोबे उर्फ मोबीन हारुण कुरेशी वर तर दुसरा गुन्हा जिन्सीत एका राजकीय व्हॉट्सअॅप ग्रुप मध्ये वक्तव्य केल्याप्रकरणी मोबाईल धारकावर करण्यात आला.
मोबीन ने ५ मे रोजी रात्री इंस्टाग्रामवर रील अपलोड केले होते. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या छायाचित्रांचा वापर करुन आक्षेपार्हरीत्या इडिटींग करुन इंस्टाग्रामववर व्हिडिओ पोस्ट केला. परिसरातील विविध राजकीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडे हा व्हिडिओ पाहता पाहता व्हायरल झाला. शरद म्हस्के यांनी व्हिडिओसह मुकूंदवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर मोबीनवर गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक सचिन वायाळ अधिक तपास करत आहेत.
धर्माविषयी अवमानकारक पोस्टरोशनगेट परिसरात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महाविकास आघाडी नावाने एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आला आहे. ५ मे रोजी रात्री १२ वाजता माफिया किंग नावाने असलेल्या मोबाईल धारकाने दोन धर्मात तेढ निर्माण होईल असे अवमानकारक पोस्ट केली. ही बाब निदर्शनास येताच काही तरुणांनी तत्काळ जिन्सी पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर अब्दुल अजीज सालमीन यांच्या तक्रारीवरुन सदर मोबाईलधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला. निरीक्षक रामेश्वर गाडे अधिक तपास करत आहेत.
हे टाळाच, नसता कारवाई अटळलोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर तसेच जिल्हा पोलिसांकडून सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट, कमेंट करणाऱ्यांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. त्यासाठी स्वतंत्र सोशल मिडिया वॉररुम तयार करण्यात आली असून विशिष्ट कमांडद्वारे सातत्याने लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे अशी कुठलिही आक्षेपार्ह पोस्ट, कमेंट केल्यास त्यावर गंभीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले.