औरंगाबाद: डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे शुक्रवारी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. मात्र, या सोहळ्याच्या एक दिवसाआधी निमंत्रण पत्रिकेत विरोधी पक्षनेते आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची नावे डावलण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे.
भारतीय विद्यार्थी सेनेचे विद्यापीठ प्रमुख तुकाराम सराफ यांनी कुलगुरु डाॅ. प्रमोद येवले यांच्याकडे या सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आणि लोकप्रतिनिधींची नावे नसल्याविषयी भावना व्यक्त केली. विद्यापीठात गटतटाचे राजकारण होता कामा नये, असे ते म्हणाले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुण्यांमध्ये केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड, राज्यातील मंत्री संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार, उदय सामंत, अतुल सावे यांची उपस्थिती राहणार आहे. जिल्हयातील सर्व खासदार, आमदार यांना आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, प्रशासनाने विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या स्थानिक लोकप्रतिनिधींची नावे नाव निमंञण पञिकेतून डावलल्यामुळे नव्या वादाल तोंड फुटले आहे.