- अमेय पाठकऔरंगाबाद: ऐन दिवाळीच्या दिवशी घरासमोर फटाके वाजवण्याच्या कारणावरून आठ ते दहा तरुणांनी दोघांना घेरून बेदम मारहाण केल्याची घटना मुकुंदवाडी परिसरात सोमवारी रात्री साडेनऊ वाजता मुकुंदवाडीतील संजयनगर येथे घडली. मारहाणीचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल असून या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची प्राथमिक माहिती अशी की, या घटनेविषयी अधिक माहिती देताना मुकुंदवाडी पोलिसांनी सांगितले की, संजयनगर येथील रहिवासी अक्षय भाऊसाहेब खरात हा इलेक्ट्रिकलचे दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. सोमवारी दिवाळी असल्याने तो त्याचा मित्र अमोलसोबत रात्री साडेनऊच्या सुमारास घरासमोर फटाके फोडत होता. यावेळी त्याच्या घरासमोरील रहिवासी राहुल लांबदांडे पाटील, शिवा खोतकर, ऋषी जगताप आणि पवन गुजर आणि अनोळखी सहा तरुणांसह तेथे आला. ‘आमच्या घरासमोर फटाके फोडू नकोस,’ असे म्हणून राहुलने शिवीगाळ आणि दमदाटी करण्यास सुरुवात केली. अक्षयचा मित्र त्यांची समजूत काढत असताना अचानक त्यांनी त्यांना फायटर, दगड आणि बेल्टने मारहाण करण्यास सुरुवात केली. यामुळे अमोलचे डोके फुटले आणि अक्षयलाही गंभीर दुखापत झाली.
यावेळी झालेल्या आरडाओरड केल्यानंतर अक्षयचे आईवडील घराबाहेर आले. यानंतर आरोपी तेथून पळून गेले. या घटनेनंतर अमोल आणि अक्षय मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गेले. पोलिसांनी त्यांना सर्वप्रथम घाटी रुग्णालयात जाऊन उपचार घेण्यासाठी पाठविले. उपचार घेऊन आल्यानंतर अक्षयने आरोपींविरोधात तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून, मारहाण करणाऱ्या तरुणांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक ब्रह्मा गिरी यांनी दिली.
फटाक्यामुळे १० वर्षीय चिमुकल्याच्या डोळ्यांना इजाफटाक्यामुळे १० वर्षीय मुलाच्या दोन्ही डोळ्यांना आणि चेहऱ्याला इजा झाल्याची घटना सोमवारी रात्री मिसारवाडी येथे घडली. या मुलाला घाटीत दाखल करण्यात आले. या मुलासह रात्री १०.३० वाजेपर्यंत फटाक्यांमुळे जखमी, भाजलेले ६ रुग्ण घाटीत दाखल झाले होते. जिल्हा रुग्णालयात फटाक्यामुळे हाताला किरकोळ जखम झालेल्या चिकलठाणा येथील चार वर्षीय मुलीवर उपचार करण्यात आले.