औरंगाबाद : अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेताना आंतरधर्मीय तरुण - तरुणीची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत व मैत्रीतून प्रेम फुलल्यानंतर त्यातून धर्मांतराची मागणी, धमक्या, अपहरण, मारहाण गुन्हे व अटक अशी झालेली होरपळ प्रेमवीर दीपक सोनवणे याने शुक्रवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितली.
तो म्हणाला, धर्मांतरासाठी तरुणीसह तिच्या नातेवाइकांनी अमानुष छळ करीत ११ लाख रुपये उकळले. त्याशिवाय विनयभंग, बलात्काराचे गुन्हे नोंदवित धर्मांतरासाठीचा अघोरी शस्त्रक्रिया विधीही त्याच्याकडून बळजबरीने करून घेण्यात आला. भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस जालिंदर शेंडगे, डेमोक्रॅटिक पीपल्स मुव्हमेंटचे मराठवाडा सचिव राहुल काकडे, पीडित तरुणाची आई यांच्यासह इतर पदाधिकारी पत्रकार परिषदेला उपस्थित होते. दीपकने सांगितल्यानुसार, तो शहरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात २०१८ पासून शिक्षण घेत आहे. यादरम्यान त्याची ओळख अन्यधर्मीय विद्यार्थिनीसोबत झाली. ओळखीतून मैत्री व त्यातून दोघांत प्रेमसंंबंध निर्माण झाले. त्या मुलीने लग्नाच्या आमिषाने दीपककडून वारंवार रोख व ऑनलाइन पद्धतीने ११ लाख रुपये उकळले. तसेच लग्नासाठी धर्मांतर करण्याची अट लादली.
मार्च २०२१ मध्ये मुलगी व तिच्या नातेवाइकांनी नारेगाव येथील घरी नेऊन दीपकला निर्वस्त्र करीत बेदम मारहाण केली. त्याचा व्हिडीओ तयार केला. बळजबरीने एका दवाखान्यात नेऊन शस्त्रक्रियाही केल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर सप्टेंबर २०२१ मध्ये तरुणावर एमआयडीसी सिडको ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा नोंदवला. चिकलठाणा पोलिस ठाण्यातही त्याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदवून त्यात त्याचे वडील व लग्न झालेल्या दोन बहिणींना आरोपी केले. जालिंदर शेंडगे म्हणाले, भाजप पीडित मुलाच्या पाठीशी असून, संबंधितांवर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिस आयुक्तांकडे करणार आहोत. त्याविषयी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही बोलणे झाल्याचे त्यांनी सांगितले.
खासदारांच्या कार्यालयात मारहाणीचा आरोपखासदार इम्तियाज जलील यांच्या कार्यालयात २० ऑगस्ट २०२२ रोजी बोलावून घेत त्यांच्या समर्थकांसह सुरक्षारक्षकांनी मारहाण केली. त्यातून पोलिसांनी सोडवणूक केल्याचा दावाही तरुणाने केला आहे.
असे काही घडले नाहीखा. जलील यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, ‘आपण दीपक नावाच्या तरुणाला ओळखतही नाही. माझ्या कार्यालयात असा काही प्रकार घडलेला नाही. भाजपवाले असे काहीही बिनबुडाचे आरोप करीत असतात. त्यास कोणताही आधार नसतो.’