औरंगाबाद : चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील के -१५ या प्लॉटवरील आनंद कुलर इंडस्ट्रीजला शुक्रवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीत संपूर्ण कारखाना जळून खाक झाला. सुमारे एक कोटीहून अधिक रक्कमेचे या घटनेत नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली.
साप्ताहिक सुटीमुळे कंपनीत एकही कामगार उपस्थित नसल्याने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. आगीचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.चिकलठाणा एमआयडीसीमध्ये कुंदन रेड्डी यांचा कुलर बनविण्याचा कारखाना आहे. सुमारे ३० ते ३५ कामगार तेथे काम करतात. दरशुक्रवारी चिकलठाणा एमआयडीसीतील क ारखान्यांना साप्ताहिक सुटी असते. यामुळे रेड्डी यांच्या कंपनीचे कामगारही आज कामावर नव्हते. महावितरणने ट्रान्सफार्मर बसविण्याचे काम हाती घेतलेले असल्याने परिसरातील वीज पुरवठा आज सकाळपासून बंद होता. कंपनीचे अकाऊंटंट मुळे आणि इतर चार कर्मचाऱ्यांनी कंपनीतील गणपतीची सकाळी साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास आरती केली. आरतीचा दिवा विझल्यानंतर ते कंपनीचे कार्यालय बंद करून कंपनीबाहेरील ओट्यावर गप्पा मारत बसले होते. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास अचानक कंपनीतून धूर निघू लागला.
कंपनीतील साहित्याला आग लागल्याचे दिसताच कामगारांनी या घटनेची माहिती तातडीने पोलीस नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल आणि एमआयडीसी सिडको ठाण्याला कळविली. माहिती मिळताच अवघ्या काही मिनिटात गरवारे कंपनीचे प्लांट हेड उर्किडे हे त्यांच्या कंपनीच्या बंबासह तेथे दाखल झाले. त्यापाठोपाठ एमआयडीसी, सिडको अग्निशमन दल, पदमपुरा येथील अग्निशमन विभाग आणि शेंद्रा एमआयडीसीचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र तापर्यंत आगीने भडका घेतला. कंपनीपासून सुमारे पाच ते सात किलोमिटरपर्यंतं धुराचे लोळ नजरेस पडत होते. सिडको एमआयडीसी ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाळे आणि अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.