मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शहरात येत आहेत. मराठा समाज विद्यार्थी वसतिगृह तातडीने सुरू करावे, सारथीचे उपक्रेंद्र प्रत्येक विभागात सुरू करावेत, यासह अन्य मागण्या सोडविण्यात याव्यात, अशी मागणी करीत मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या प्रमुख समन्वयकांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाहनांचा ताफा अडविणार, मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविणार, असा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वीच पोलिसांनी समन्वयकांना नोटिसा बजावल्या. आज गुरुवारी पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, आंदोलकांनी त्यांना नकार दिल्याने पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आंदोलकांना चर्चेसाठी बोलावले. या वेळी आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांशी भेट घडवून आणावी आणि प्रमुख मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी घोषणा करण्याची तयारी दर्शविली, तर आंदोलन मागे घेऊ अशी भूमिका घेतली. मात्र, यासंदर्भात कोणतेही आश्वासन पालकमंत्र्यांनी न दिल्याचे चर्चा फिसकटली. बैठकीतून बाहेर पडताच सिडको पोलिसांनी रमेश केरे पाटील, आप्पासाहेब कुढेकर, निवृत्ती मांडकीकर, राहुल पाटील यांना ताब्यात घेऊन सिडको ठाण्यात नेले.
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 4:04 AM