औरंगाबाद : दहावी - बारावी परीक्षा काॅपीमुक्त, निकोप वातावरणात पार पाडण्यासाठी विभागीय शिक्षण मंडळ, शिक्षण विभागाकडून बैठे पथक, फिरत्या पथकांचे नियोजन सुरू आहे. विषय शिक्षकांना ते शिकवत असलेल्या विषयाच्या पेपरच्या दिवशी शाळेच्या आवारात बोलावू नये, अशा सूचना विभागीय मंडळाकडून परीक्षा मुख्य व उपकेंद्रांना देण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांनी परीक्षेवेळी सॅनिटायझर सोबत आणण्याच्या सूचना द्यायच्या आहेत. त्याशिवाय विद्यार्थिसंख्येनुसार सॅनिटायझरची तरतूद बोर्डाकडून करण्यात आली आहे. जिल्ह्यात ९०६ शाळांतील ६४ हजार ६२२ विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेसाठी अर्ज भरले असून, त्यांची २२४ केंद्र आणि ६२१ उपकेंद्रांवर परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार घेतली जाणार आहे, तर ४७१ कनिष्ठ महाविद्यालयांतील ५८ हजार ३४७ विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज केले असून, १५३ मुख्य केंद्रे आणि २८७ उपकेंद्रांवर परीक्षा होणार असल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले. विषय शिक्षक, परीक्षा केंद्रावर नियुक्त व्यक्तीशिवाय इतरांना आवारात प्रवेश न देण्याच्या सूचना बोर्डाकडून केंद्र संचालकांना देण्यात आल्या आहेत.
आजपासून दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षादहावीची लेखी परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल, तर प्रात्यक्षिक परीक्षा २५ फेब्रुवारी ते १४ मार्चदरम्यान होणार आहे. बारावीची लेखी परीक्षा ४ ते ३० मार्चदरम्यान होणार असून, प्रात्यक्षिक परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्चपर्यंत होत आहेत. पहिल्या टप्प्यातील प्रात्यक्षिक पूर्ण झाले असून, तुरळक राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा दुसऱ्या टप्प्यात होतील.
सहायक परिरक्षकांचे असेल बैठे पथकसहायक परिरक्षक (रनर) यांना याचे भत्ता व मानधन देण्यात येणार आहे. मुख्य केंद्राच्या संलग्न शाळांना उपकेंद्र घोषित केल्याने तिथे परीक्षा घेण्यासाठी प्रत्येक शाळेला एक रनर प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिकांची ने-आण करतील. रनर हे त्या शाळेचे नसल्याने ते बैठ्या पथकाची भूमिका बजावणार आहे. याशिवाय फिरती आठ पथके असतील. शहरी व ग्रामीण आणि अंतरानुसार पाचशे ते नऊशे रुपयांपर्यंत त्यांना मानधन देण्यात येणार असून, रनर हे बैठ्या पथकाची भूमिकाही बजावतील.
पेट्यांची दुरुस्ती; युद्धपातळीवर तयारीबोर्डात सध्या प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिकांच्या ने - आण करण्यासंबंधीची गोपनीय तयारी सुरू असून, पेट्यांची दुरुस्ती सध्या सुरू आहे. सुटीच्या दिवशीही ही कामे युद्धपातळीवर केली जात आहेत.