कन्नड - शहरात फिरणाऱ्या रिकामटेकड्यां विरुद्ध तसेच सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्स ) न ठेवणाऱ्या नऊ जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम १८८ भादवि अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पोलीसांनी घेतलेल्या या पावित्र्यामुळे अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडणाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे यांनी सांगीतले की कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक कायदा लागु करण्यात आलेला आहे. त्यानुसार नागरीकांनी घराबाहेर न पडता घरी राहणेच अपेक्षित आहे. अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडल्यास योग्य सामाजिक अंतर ठेवणे आवश्यक आहे. या आदेशाचे उल्लंघन करून शहरातील पिशोर नाका, शनिमंदीर, सिद्दीक चौक या भागात विनाकारण फिरणाऱ्या व सामाजिक अंतर न ठेवणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांनी कायद्याचे पालन करून अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये व सामाजिक अंतर पाळावे असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, पोलीस कर्मचारी व शहरातील गरजुंना सॅनिटायझर वाटून पोनि. रामेश्वर रेंगे यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला.