- नजीर शेख
औरंगाबाद : मागील चार महिन्यांत आणि लॉकडाऊनच्या काळात पोलिसांसाठी एक आव्हानाची बाब होती. या काळात १२ ते १४ तास ड्यूटी करून आपले कर्तव्य बजावणे ही महत्त्वाची बाब होती. पोलिसांच्या घरातही अनेक ताणतणाव होते. मात्र, या काळात कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने किंवा कर्मचाऱ्याने ड्यूटी नाकारली नाही किंवा ड्यूटीचे स्थळ बदलून देण्याची मागणी केली नाही.
पोलिसांच्या या बळावरच आम्ही काम करीत आहोत, असे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत स्पष्ट केले. कोरोनाचा शहरात प्रादुर्भाव होत असल्याच्या पार्श्वभूमीवर चिरंजीव प्रसाद यांनी मागील चार महिन्यांच्या काळातील कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि या काळातील अनुभव यासंदर्भात ‘लोकमत’च्या संपादकीय सहकाऱ्याशी पोलीस आयुक्त कार्यालयात मनमोकळी बातचीत केली.
लॉकडाऊनकडे तुम्ही कसे पाहता?यावेळी लॉकडाऊनमध्ये नागरिकांचे मोठे सहकार्य पोलीस आणि महापालिकेला मिळाले आहे. लॉकडाऊन लावण्यापूर्वी तीन ते चार दिवस नागरिकांना मिळाले. यामुळे त्यांना धान्य आणि भाजीपाला घेऊन ठेवता आला. किराणा आणि भाजीपाला यावेळी बंद राहिला. पेट्रोलपंपही बंद राहिले. मोटारसायकलींना पेट्रोल मिळाले नाही. याचा परिणाम रस्त्यावर वाहनांची गर्दी दिसली नाही. विशेष म्हणजे नागरिकांनीच यावेळी बाहेर न पडण्याचे ठरविले होते. याआधी ६ दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात आला होता त्यावेळी काही गोष्टी चालू होत्या. लॉकडाऊन लावताना नागरिकांच्या हक्काचा विचार करावा लागतो. जनतेचे हक्क आणि आम्हाला येणाऱ्या सूचना याचा विचार करून बॅलन्स साधावा लागतो. मार्शल लॉ सारखे वातावरण निर्माण करण्याच्या बाजूने मी नाही. जिथे गरज असेल तिथे सूट दिली पाहिजे. मात्र, यावेळी नागरिकांनी खूपच चांगला प्रतिसाद दिला आणि ते खूप प्रशंसनीय आहे. मेडिकल किंवा इतर कारणांसाठी लोक कमी बाहेर पडले. पूर्वी लावण्यात आलेले लॉकडाऊन सरकारच्या सूचनेनुसार होते. आता आम्ही आमच्या निर्णयाप्रमाणे लॉकडाऊन केले आहे.
यावेळी बंदोबस्त कसा ठेवला?पोलिसांचे काम नेहमीप्रमाणेच सुरू आहे. यावेळी आम्हाला राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी बंदोबस्तासाठी मिळाली. 100 होमगार्डही मिळाले. याशिवाय महापालिकेचे ४०० कर्मचारी नाकाबंदीसाठी पोलिसांसमवेत उभे होते. त्याचा चांगला परिणाम दिसला. लोकच घराबाहेर न पडल्याने पोलिसांना फारसा त्रास झाला नाही. आमचे काम सोपे झाले. याचे श्रेय अर्थातच जनतेलाच आहे.
लॉकडाऊनमध्ये शहरातील क्राईम रेट कमी झाला आहे. तो यापुढेही तसाच राहील का?लॉकडाऊनच्या काळात नॉर्मल क्राईम कमी झाले आहेत, हे स्पष्टपणे दिसत आहे. घरगुती हिंसाचार वाढला असल्याचे काही वेळा समोर येते. मात्र, औरंगाबाद पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे, असे दिसत नाही. काही लोक ‘डिप्रेशन’मध्ये गेले असतील. त्यांच्या परिस्थितीचाही विचार पोलिसांना करावा लागतो. लॉकडाऊननंतरच्या काळातही शहरातील ‘क्राईम रेट’ कमी राहील, याचा प्रयत्न आम्ही करू.
कोरोनाच्या शहरातील परिस्थितीकडे आपण कसे पाहता?कोविड हा संसर्गजन्य रोग आहे. पहिल्या टप्प्यात लोक शहराबाहेर जात होते आणि शहरातही बाहेरून लोक येत होते. आता महापालिकेचे वॉर फुटिंगवर काम चालू आहे. संशयित रुग्ण शोधण्याचे काम वेगाने सुरू आहे. यामुळे परिस्थिती आटोक्यात येण्यास मदत होईल, असे वाटते. कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे काम नाही. ही एका दृष्टीने चांगली बाब आहे. चांगली बाब यासाठी की यापुढे ‘त्या’ लोकांपासून होणारा संसर्ग कमी होईल व रुग्णसंख्या पुढे कमी होण्यास मदत होईल.
नागरिकांना काय आवाहन कराल?कोरोनाला आपण हरवू शकतो, हा ठाम विश्वास मनात ठेवा. मास्क वापरा आणि सोशल डिस्टन्सिंंग पाळा, बेसिक इम्युनिटी वाढवा. या गोष्टी नागरिकांनी पक्क्या मनात बिंबवल्या पाहिजेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नागरिकांनी आपली प्रतिकारक्षमता वाढविणे गरजेचे आहे. विषाणूंचा प्रभाव कमी करण्यासाठी गरम पाणी पिणे किंवा गळा थंड राहणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. यापुढे लॉकडाऊननंतरही नागरिकांनी ही दक्षता घेतली पाहिजे, असे आमचे आवाहन आहे.
कम्युनिटी पोलिसांमार्फत या चार महिन्यांच्या काळात कसे काम केले?कम्युनिटी पोलिसांमार्फत आम्ही विविध टीमशी संपर्क केला. पहिल्या लॉकडाऊनच्या काळात गरजू जनतेपर्यंत धान्य आणि आवश्यक वस्तू पोहोचविल्या. संजयनगर, बजाजनगर, याठिकाणी सामान आणून देण्यासाठी स्वयंसेवक तयार केले. अनेक दानशूर व्यक्तींनी मदत केली. रेल्वेने परप्रांतीय नागरिकांना परत पाठवत असताना अनेकांनी या लोकांसाठी भोजन, पाणी, राहण्याची व्यवस्था आणि अगदी चपलांचीही सोय केली. जालन्याचे अरुणिमा फाऊंडेशन, औरंगाबाद लायन्स क्लब यासारख्या संस्थांची मोठी मदत झाली.
पोलिसांची काळजी आपण कशी घेत आहात?माझ्या स्टाफमधील अनेक अधिकारी, कर्मचारी सकाळी आठ-साडेआठ वाजेपासून ते रात्री नऊ- दहा वाजेपर्यंत ड्यूटी करीत आहेत; परंतु कोणत्याही कर्मचाऱ्याने मागील चार महिन्यांच्या काळात ड्यूटी नाकारली नाही किंवा आहे त्या ठिकाणाहून हटविण्याची मागणी केली नाही. मला माझ्या स्टाफचा अभिमान आहे. आम्ही काही लोकांना आराम दिला. ‘आर्सेनिक अल्बम’च्या गोळ्या दिल्या. व्हिटॅमिन सी, डी आणि झिंक टॅब्लेटचे वाटप केले. पोलिसांना मास्क, सॅनिटायझर आणि फेसशिल्ड पुरविले. आमच्याही ६१ पोलीस आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. दुर्दैवाने एकाचा त्यामध्ये मृत्यूू झाला. बाकीचे लोक त्यामधून बाहेर आले. पोलिसांसोबतच एसआरपीएफचे औरंगाबाद आणि हिंगोली येथील कर्मचाऱ्यांचीही आम्ही काळजी घेतली. महापालिकेनेही आम्ही मागणी केली तेव्हा आम्हाला सेवा पुरविली. तरीही माझे माझ्या कर्मचाऱ्यांना सांगणे आहे की, बेसिक सॅनिटायझेशनचे तत्त्व अमलात आणा आणि प्रकृती बिघडल्यास तात्काळ डॉक्टरला दाखवा.
लॉकडाऊन संपल्यानंतरची परिस्थिती कशी राहील?लॉकडाऊननंतरही नागरिकांनी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंंग पाळणे आवश्यकच आहे. मोंढ्यात गर्दी होऊ नये म्हणून काळजी घेऊ. जाधववाडी, शाहगंज आणि इतर मंडईत गर्दी होणार नाही, याची काळजी घेऊ. बेसिक हायजीनची नागरिकांनी काळजी घ्यावी व आम्हीही त्यादृष्टीने प्रयत्न करू. लॉकडाऊनसंदर्भात विचार करताना आर्थिक आणि औद्योगिक क्षेत्राचा विचार करावा लागतो. त्याचा विचार केला जाईल. लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर सम- विषम पद्धत बंद करून दररोज दुकाने चालू ठेवण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. नागरिकांनीही बाजारातील परिस्थितीचा अंदाज घेऊनच बाहेर पडावे.
सिर्फ आलू खाने को मिल रहे हैलॉकडाऊनच्या काळात दिनचर्या कशी आहे, यासंदर्भात बोलताना चिरंजीव प्रसाद म्हणाले की, सध्या सकाळी लवकर काम सुरू करतोय. काही वेळा राऊंड घेऊन कार्यालयात येत आहे. दिनचर्या म्हणाल तर सध्या सर्व बंद असल्याने ‘तिनो वक्त आलू खाने को मिलते है’ अशी मिश्कील टिपणीही त्यांनी केली.