औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोना संक्रमणाच्या काळात सुरुवातीला पीपीई कीट, एन-९५ मास्कच्या उपलब्धतेची ओरड झाली. मात्र, सध्या पुढील सुमारे तीन महिने पुरेल एवढा साठा उपलब्ध आहे. शासनाच्या सूचनेनुसार पुढील डिसेंबरपर्यंत लागणाऱ्या साहित्याची मागणी केल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आली.
घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर म्हणाल्या, सध्या तीन महिने पुरेल एवढी सुरक्षा साधनांची उपलब्धता रुग्णालयात आहे. गरज पडल्यास सार्वजनिक आरोग्य विभागाकडूनही मदत मिळते, तसेच डीएमईआरकडून पावसाळ्यात पुरवठ्यातील अडचणी लक्षात घेऊन डिसेंबरपर्यंतची मागणी केलेली आहे. प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ म्हणाले, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून ग्रामीण भागात सर्वेक्षण सुरू आहे. यात आशा वर्कर, शिक्षकांची मदत घेतली असून, गंगापूर, वाळूज बजाजनगर परिसरासह, वैजापूरमध्ये रुग्ण वाढत आहेत. मात्र, पुरेशा प्रमाणात अलगीकरण व विलगीकरणाची व्यवस्था आहे. सर्जिकल मास्कच्या किमती वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या दिसून आल्या. दहा ते पंधरा रुपयांपर्यंत विक्री होत आहे, तर एन-९५ मास्क १०० रुपयांपासून अडीचशे रुपयांपर्यंत बाजारात उपलब्ध आहे.
तक्रार असेल तर संपर्क साधाजिल्ह्यात दोन आणि तीन लेअरचे मास्क मेडिकलवर उपलब्ध आहेत. त्याच्या किमती ठरवून देण्यात आलेल्या आहेत. त्यापेक्षा अधिक दराने विक्री केल्याची दोन महिन्यांत एकही तक्रार नाही. तरीही औषध विक्रेत्यांना वेळोवेळी सूचना दिल्या जात आहेत. ग्राहकांना कोरोनासंदर्भातील औषधांसदर्भात अडचणी असल्यास त्यांनी औषध प्रशासनाशी संपर्क साधवा, असे औषध प्रशासनाचे सहआयुक्त संजय काळे यांनी सांगितले.