औरंगाबाद : कोरोनाविरुद्धच्या लढ्यात ढाल ठरणारी प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतरही काही जण कोरोनाबाधित होत असल्याचे निदर्शनास येत आहे. लस निश्चितच सुरक्षाकवच ठरत आहे. पण ॲण्टिबाॅडीज तयार होण्यापूर्वी कोरोना गाठू शकतो. कारण लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर १५ दिवसांनी ॲॅण्टिबाॅडीज तयार होतात. लस घेतल्यानंतरही कोरोना होण्याची शक्यता जवळपास १९ टक्के आहे. शिवाय लसीमुळे कोरोनाची गंभीर लक्षणे टळतात. लसीकरणानंतरही मास्कचा वापर महत्त्वपूर्ण असून, कोणतीही शंका आणि भीती न बाळगता लस घ्यावी, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
लसीचा दुसरा डोस झाल्यानंतरही संसर्ग होऊ शकतो. मात्र, संसर्ग अत्यंत सौम्य स्वरूपाचा असतो. जिल्ह्यात दोन कोरोना लसी उपलब्ध असून, त्या जवळपास ७२ ते ८१ टक्के परिणामकारक असल्याचे सांगितले जाते. लसीचा दुसरा डोस घेतलेल्यांना कोरोनामुळे गंभीर अवस्थेत रुग्णालयात भरती होण्याची शक्यता अगदी कमी असते. कोणतीच लस १०० टक्के परिणामकारक नसते आणि कोरोना लसही त्याला अपवाद नाही. त्यामुळे लस घेऊनही प्रतिकारशक्ती तयार झाली नाही, प्रतिकारशक्ती तयार होण्यापूर्वी कोरोनाची लागण होणे, असे काही लोकांच्या बाबतीत घडू शकते, असे तज्ज्ञांनी सांगितले.
गंभीर लक्षणे टळलीघाटीच्या अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर यांना कोरोनाची लागण झाली. त्यांनी लसीचे दोन डोस घेतले होते. त्यामुळे गंभीर लक्षणे टळण्यास मदत झाली. गंभीर लक्षणे नसल्यानेच घाटीतील आक्सिजन बेड गरजू रुग्णाला उपलब्ध होण्यासाठी त्यांनी खाजगी रुग्णालयात दाखल होण्यास प्राधान्य दिला. महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ.नीता पाडळकर यांनाही कोरोनाची लागण झाली. त्यांनीही लसीचे दोन डोस घेतले होते. कोरोना लसीचा फायदा झाल्यामुळे कोणताही त्रास नसल्याने त्यांनी होम आयसोलेशन म्हणजे घरीच उपचार घेण्यास प्राधान्य दिले.
भिती, शंका मनात न आणता लस घ्यावीकोव्हिशील्ड लस आणि कोव्हॅक्सिन लस अतिशय परिणामकारक आहेत. लसीचे दोन डोस घेतल्यानंतर १५ दिवसांनंतर संरक्षक अँटीबाॅडीज तयार होतात. त्यानंतरही कोरोना झाला तर आजार गंभीर होत नाही. मृत्यूचा धोकाही टळतो. लक्षणे अतिशय सौम्य असतात. त्यामुळे कोणतीही भिती, शंका मनात न आणता पात्र लोकांनी लस घेतली पाहिजे. सध्या मास्क आणि लस या दोन गोष्टी आपल्याकडे आहे. त्याचा उपयोग प्रत्येकाने केला पाहिजे.- डॉ. जगन्नाथ दीक्षित, लसीकरण नोडल ऑफिसर व जनऔषध वैद्यकशास्त्र विभागप्रमुख, घाटी