औरंगाबाद : कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून औरंगाबादसह राज्यातील पोलिसांना ब्रेथ ॲनालायझर यंत्राचा वापर करू नका असे स्पष्ट आदेश आहेत. यामुळे मद्यपी वाहनचालकांची तपासणी करण्यासाठीची ही यंत्रे धूळ खात पडून आहेत. परिणामी मद्यपींची वाहने सुसाट सुटली आहेत. गतवर्षी जानेवारी ते मार्च महिन्यात वाहतूक पोलिसांनी ३०३ मद्यपी वाहनचालकांवर केसेस केल्या. यानंतर एकही केस झालेली नाही.
औरंगाबाद शहराचा चोहोबाजूंनी विकास होत आहे. औद्योगिक वसाहतीत कामधंद्यानिमित्त परराज्यांतून आणि बाहेरगावचे लाखो लोक औरंगाबाद शहरात स्थायिक झाले आहेत. दारू प्राशन करून वाहन चालविणे हा गुन्हा आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री नववर्ष स्वागताच्या पार्टीत तर्रर्र होऊन बहुतेक लोक गाड्या चालवितात. यामुळे ३१ डिसेंबरच्या रात्री पोलीस विशेष नाकाबंदी करून मद्यपी वाहनचालकांची ब्रेथ ॲनालायझर यंत्राद्वारे तपासणी करतात. ही तपासणी करताना मद्यपीला तोंडावाटे यंत्रात हवा फुंकण्यास सांगितले जाते. एका यंत्राचा वापर अनेकांना केल्यास कोरोना संसर्ग पसरण्याचा धोका होता. ही बाब लक्षात घेऊन शासनाच्या आदेशाने गतवर्षी एप्रिलपासून शहर पोलिसांनी ब्रेथ ॲनालायझर यंत्राचा वापर बंद केला. अजूनही कोरोनाचा कहर संपलेला नाही. यामुळे नवीन वर्षातही ब्रेथ ॲनालायझर यंत्राचा वापर सुरू करण्याचे आदेश पोलिसांना प्राप्त झालेले नाहीत.
वाहनचालकाची वैद्यकीय तपासणी करून कारवाईब्रेथ ॲनालायझर यंत्रे येण्यापूर्वी मद्यपी वाहनचालकांवर ज्या पद्धतीने कारवाई होत असे, आता तीच पद्धती वापरली जात आहे. मद्यपीला पकडल्यानंतर त्याला घाटी रुग्णालयात नेऊन त्याची वैद्यकीय तपासणी केली जाते. रक्ताचा नमुना घेऊन प्रयोगशाळेत पाठवून अहवाल मागविला जातो. या अहवालाच्या आधारे वाहनचालक दारूच्या अमलाखाली असल्याचे समोर आल्यावर त्यांच्याविरुद्ध न्यायालयात खटला भरला जातो. मात्र, अशा केसेचे प्रमाण अत्यल्प असल्याचे सूत्राने सांगितले.
कोरोना आणि लॉकडाऊन कालावधीत घटली मद्यविक्रीलॉकडाऊन लागल्याने चार महिने मद्यालये बंद होती. याचा परिणाम मद्यविक्रीवर झाला. नेहमीच्या तुलनेत गतवर्षी मद्य विक्रीत ४० टक्के घट झाली. मद्यालये बंद असल्याच्या कालावधीत हातभट्टीची दारू आणि चोरट्या मार्गाने दारू विक्री जोमात होती. या कालावधीत पोलिसांनी अवैध मद्यविक्री करणाऱ्यांवर सतत केसेस केल्या.
डॉक्टरांचा अहवाल पुरावाब्रेथ ॲनालायझरचा वापर सध्या बंद आहे. असे असले तरी वाहनचालक दारू पिऊन वाहन चालविताना आढळून आल्यावर त्याच्याविरुद्ध जवळच्या पोलीस ठाण्यात कलम १८५ नुसार गुन्हा दाखल करून कारवाई केली जाते. मद्यपी वाहनचालकाची वैद्यकीय तपासणी करून डॉक्टरांचा अहवाल पुरावा म्हणून न्यायालयात सादर केला जातो.- मुकुंद देशमुख, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा.
गतवर्षी २०२० मध्ये ब्रेथ ॲनालायझर यंत्राद्वारे ३०३ मद्यपींवर कारवाईजानेवारी - १४३फेब्रुवारी- ९३मार्च - ६७एप्रिल ते डिसेंबर - 00