औरंगाबाद : कोरोनाच्या नव्या म्युटंटच्या (Omicron Variant) पार्श्वभूमीवर सर्वत्र खबरदारी घेण्यात येत असून, आरोग्य यंत्रणेकडून तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने तयारीही सुरू करण्यात आली आहे. मात्र, ही तिसरी लाट चांगलीच महागात ठरणार आहे. कारण दुसऱ्या लाटेपेक्षा ४० टक्के वाढीव निधीच्या मागणीची तयारी घाटी रुग्णालयाने केली आहे.
दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर घाटीत नियमित रुग्णसेवा पूर्वपदावर आली. मात्र, आता पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढीची शक्यता वर्तविली जात आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने घाटी रुग्णालयात एक हजार खाटांचे नियोजन करण्यात येत आहे. यामध्ये १५० खाटा या आयसीयू खाटा राहतील. मार्च २०२२ पर्यंत तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. नियमित रुग्णसेवेबरोबर कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी औषधी, ऑक्सिजनपासून आहारापर्यंत अनेक गोष्टींवर खर्च करावा लागणार आहे. दुसऱ्या लाटेत मंजूर करण्यात आलेल्या निधीच्या ४० टक्के वाढीव निधीची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्यात येणार आहे, अशी माहिती घाटीतील सूत्रांनी दिली.
ऑक्सिजन, औषधी, यंत्रसामुग्रीवर सर्वाधिक खर्चघाटीत दुसऱ्या लाटेत खाटांची संख्या एक हजारांपर्यंत वाढविण्यात आली आहे. या खाटा पुन्हा एकदा कार्यान्वित कराव्या लागणार आहेत. ऑक्सिजन, औषधी आणि यंत्रसामग्रीसाठी सर्वाधिक निधी मागण्यात आला आहे. यातूनच ऑक्सिजनची प्रलंबित देयकेही दिली जातील.
आवश्यक बाबी -- आवश्यक निधी- औषधी- ४ कोटी ९३ लाख ९८ हजार ७४४ रु.- सर्जिकल साहित्य - १ कोटी ४० लाख रु.- यंत्रसामुग्री- ७ कोटी ३३ लाख ७३ हजार ७३८ रु.- केमिकल किट - १ कोटी ६६ लाख ६० हजार रु.- ऑक्सिजन - ४ कोटी २० लाख रु. (प्रलंबित देयके)- आहार -१ कोटी १६ लाख ६६ हजार ६६६ रु.- वाहन विभाग- ९ लाख ८० हजार रु.-बायोमेडिकल वेस्ट - ३६ लाख १० हजार ६०० रु.-लिनन - ४० लाख रु.- रक्त नमुने तपासणी- ८० लाख रु.-मनुष्यबळ - २ कोटी ५२ लाख रु.- पीएसए प्लांटची विद्युत देयके- १ कोटी रु.