औरंगाबाद : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात ३० नोव्हेंबर रात्री १२ वाजेपर्यत मिशन बिगीन अगेनअंतर्गत लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आला आहे. लॉकडाऊन करणार नाही, मात्र नियम कडक करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात आणि मनपा हद्दीत करावयाच्या उपाययोजनांबाबत संबंधित यंत्रणांना तातडीने आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्य सचिवांकडून प्राप्त शासन आदेशानुसार दिल्ली, गुजरात, राजस्थान तसेच गोवा या राज्यातून विमान, रेल्वे अथवा रस्ते वाहतूक मार्गे येणाऱ्या प्रवाशांची कोरोनाची तपासणी करूनच राज्यात प्रवेश देण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात विमान, रेल्वे अथवा रस्ते वाहतूकमार्गे येणाऱ्या प्रवाशांच्या तपासणीचे आदेश आहेत. महापालिका प्रशासकांनी चिकलठाणा विमानतळ व रेल्वे स्टेशन येथे आरोग्य विभागाचे पथक उपलब्ध करून दिले आहे. जिल्ह्याच्या सीमांवर तपासणीसाठी पोस्ट लावण्यात येणार आहेत. विमानतळ, रेल्वेस्टेशनवर तयारी झाली आहे. दोन दिवसांत जिल्ह्यांच्या सर्व सीमांवर येणाऱ्या वाहनांंची तपासणी करण्याच्या अनुषंगाने निर्णय होणार असल्याचे जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले.
प्रवासी त्या राज्यातून आल्याची माहिती कळवा दिल्ली, गुजरात, राजस्थान तसेच गोवा या राज्यातून शहरात पाहुणे आले असतील, किंवा स्थानिक वाहनातून त्यांनी प्रवास केला. अशा नागरिकांची माहिती दडवून ठेवल्यास नातेवाईकांवर देखील आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. त्या राज्यांतून प्रवासी आले असतील तर त्याची माहिती स्थानिक प्रशासनाला कळविल्यास कोरोना तपासणी करणे सोपे होईल, असेही ते म्हणाले.
औरंगाबादच्या यंत्रणेसाठी सूचना अशा दिल्ली, राजस्थान, गुजरात व गोवा या राज्यातून विमानतळावर येणाऱ्या विमान प्रवाशांकडे विमानतळावर येण्यापूर्वी आरटीपीसीआर चाचणीचे निगेटिव्ह अहवाल सोबत असणे आवश्यक आहे. विमानतळावर येण्यापूर्वी ७२ तास आधी चाचणीचे नमुने घेणे आवश्यक आहे. विमानतळ प्राधिकरणाने आरटीपीसीआरसाठी एजन्सी नेमली तर नाममात्र शुल्क आकारावे. प्रवाशांची पूर्ण माहिती प्राधिकरणाने ठेवावी. रेल्वेने जिल्ह्यात येण्यापूर्वी ९६ तास आधी आरटीपीसीआर चाचणीचे नमुने घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील करमाड, लासूर स्टेशन, रोटेगाव या ठिकाणी जिल्हा शल्यचिकित्सकांनी आरोग्य पथक स्थापन करून प्रवाशांची तपासणी करावी.