मुजीब देवणीकर
औरंगाबाद : कोरोना महामारीने समाज आणि शासनासमोर आव्हानांचा डोंगर उभा केला आहे. कोरोनाने हजारो नागरिकांना आतापर्यंत जीव गमवावा लागला. मृत्युसत्र अजूनही थांबलेले नाही. कोरोना विषाणूने अनेक बालकांच्या डोक्यावरील छत्र हरपले. आई-वडीलच दगावल्यामुळे मुले अनाथ झाली आहेत. अनाथ बालकांचा शोध घेऊन त्यांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी आता राज्य शासनाने स्वीकारली आहे. मुलांच्या नातेवाइकांनी त्यांचा सांभाळ केल्यास, शासनाकडून आर्थिक साहाय्यही देण्यात येईल.
कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत सर्वाधिक जीवितहानी झाली. जिल्ह्यात आतापर्यंत ३ हजार १०६ रुग्णांचा मृत्यू झाला. संशयित कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या यापेक्षा तीनपट आहे. दुसऱ्या लाटेत ३० ते ४५ वयोगटांतील नागरिकांचे प्रमाणही चांगलेच वाढीस लागले आहे. अनेक कुटुंबांमधील आई-वडिलांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या लहान मुलांचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून औरंगाबाद जिल्ह्यातील अशा बालकांचा शोध घेण्यात येत आहे. ज्यांचे पालक कोरोनाने हिरावले आहेत, त्यांना आर्थिक, शैक्षणिक आधार देण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर, जिल्ह्यात किती बालक आहेत, याचा आकडा समोर येईल, असे महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
आई किंवा वडिलांचा मृत्यू झाल्यास १,१०० रुपयांची मदत...
कोरोनामुळे आई किंवा वडिलांचा मृत्यू झाला असल्यास, अशा बालकांना महिला व बालकल्याण विभागाच्या बालसंगोपन योजनेतून आर्थिक मदत करण्यात येणार आहे.
या योजनेतून यापूर्वी ४२५ रुपयांची मदत मिळत होती. आता सरकारने ही मदत दरमहा १,१०० रुपयांपर्यंत वाढविली आहे.
बालकल्याण विभाग अशा बालकांचा अहवाल बाल समितीसमोर सादर करेल. नातेवाईक सांभाळ करण्यास तयार झाले, तर त्यांना अकराशे रुपयांची मदत वर्षभर मिळणार आहे.
या अनाथ मुलांचे सरकार करणार काय...
सध्या कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांचा शोध सर्वेक्षणाच्या माध्यमातून गावोगाव घेतला जात आहे. यातून अनाथ आढळून येणाऱ्या मुलांची संपूर्ण कौटुंबिक माहिती एकत्रित केली जाणार आहे.
ज्या मुलाची आर्थिक परिस्थिती बिकट आहे, राहण्यास घर नाही किंवा सांभाळ करणारेही कोणी नाहीत, अशी परिस्थिती असेल, तर त्या बालकास बाल समितीच्या माध्यमातून बालगृह, बालकाश्रमात ठेवले जाईल. पाठीशी कोणताही आर्थिक आधार नसल्यास, शासनच या बालकांच्या पुनर्वसनाचा भार उचलण्याची शक्यता आहे.
.....................
सर्वेक्षण सुरू आहे
कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांचा शोध घेतला जात आहे. सर्वेक्षणात सापडलेल्या बालकांचा अहवाल तयार करून बाल समितीसमोर सादर केला जाणार आहे. त्या-त्या बालकांची परिस्थिती, गरज लक्षात घेऊन मदत, पुनर्वसनाबाबत बालसमिती योग्य तो निर्णय घेईल.
- हर्षा देशमुख, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी.