श्रीकांत पोफळे
करमाड : कोरोना संकटासह शेती व्यवसायावरील मंदीच्या सावटाने सतत दुसऱ्या वर्षी बैल पोळा सणाचा उत्साह मावळल्याचे दिसते आहे. बैल सजावट साहित्य बनवणाऱ्या कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे.
बैल पोळा सोमवारी (दि.६) आहे. बैल सजावट साहित्याची तयारी करण्यास पोळा सणाच्या महिनाभर अगोदर कारागीर लागतात. सजावट साहित्य तयार करणाऱ्या कारागिरांची संख्याही मोठी आहे. सजावट साहित्य तयार करून ते औरंगाबाद जिल्ह्यातील आठवडी बाजारात विक्री करतात. या साहित्य विक्रीतून महिनाभरात हे कारागीर वर्षभराची कमाई करून घेतात; परंतु यंदा दुष्काळी परिस्थितीसह कोरोनामुळे साहित्य तयार करण्यासाठी वेळेवर कच्चा माल मिळाला नाही. शिवाय सजावट साहित्य तयार केले, तर विकेल का? असा प्रश्न या कारागिरांसमोर उभा राहिला आहे.
पोळा भरणार का?
गावातील मारुती मंदिर परिसरात दुपारी ४ ते ५ वाजेदरम्यान पोळा भरतो. यात मोठी गर्दी होते; परंतु सध्या कोरोनाचे निर्बंध लागू असल्याने सर्व धार्मिक सणांवर बंदी आहे. त्यामुळे पोळा भरणार की नाही, यावर शंका आहे.
- सजावट साहित्य तयार करून ते विकून वर्षभराची कमाई होते; परंतु यंदा कोरोनामुळे सजावटीचे साहित्य तयार करण्यासाठी मटेरिअल मिळाले नाही. त्यामुळे जुन्या सजावट साहित्याची आता किरकोळ दुरुस्ती करीत आहे. सतत दुसऱ्या वर्षी कोरोनाचे सावट, दुष्काळी स्थितीने उपासमार होत आहे.
कोंडिबा शिंदे, (लाडसावंगी, कारागीर)
-यंदा कोरोनामुळे पोळा भरतो की नाही माहीत नाही. त्यामुळे जुने सजावट साहित्य किरकोळ दुरुस्ती करून तेच पोळा सणाला वापरणार आहे.
-प्रवीण पडूळ (लाडसावंगी, शेतकरी)
फोटो - १)
लाडसावंगी येथे बैल पोळ्यासाठी अशा प्रकारे बाजार सजलेला आहे.