औरंगाबाद : कोरोनाने जीवन जगण्याची दिशा बदलून अनेकांची दशा केली आहे. अनेक कुटुंबं या विषाणूच्या संसर्गाने उद्ध्वस्त झाले असून, जिल्ह्यातील १३ बालकांचे आई आणि वडिलांचे छत्र या विषाणूने हिरावून घेतले. माता-पित्यांविना पोरक्या झालेल्या या बालकांना बालगृहात ठेवण्यात येणार आहे. त्यांना ११०० रुपये अनुदान दरमहा देण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील ३३९ बालकांचे आई किंवा वडील कोरोनाने दगावले आहेत. त्यांना देखील शासन योजनांचा लाभ देण्यात येणार आहे.
एक पालक गमावलेल्या ३२६ आणि दोन्ही पालक गमावलेल्या १३ बालकांना शासनाच्या नियमानुसार सर्व योजनांचा, २६५ विधवा महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. दोन्ही पालक गमावलेल्या १३ बालकांपैकी तीन बालकांना बालगृहात प्रवेशित करण्यात येणार आहे. तर १० बालकांना बालकल्याण समितीसमोर उपस्थित करून दरमहा अकराशे रुपये योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. लाभ देण्याची कार्यवाही आठवडाभरात पूर्ण करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत दिले असे आदेश
कोरोना विषाणूमुळे आई वडिलांपैकी एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांच्या न्याय्य हक्काबरोबरच शासनाच्या योजनांचा लाभ तत्काळ मिळवून द्या, असे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना मंगळवारी दिले. जिल्हाधिकारी कार्यालय समिती सभागृहात जिल्हा कृती दलाची बैठक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, समिती अध्यक्ष ज्योती पत्की, अधिकारी हर्षा देशमुख, प्रसाद मिरकले, महादेव डोंगरे, चाईल्ड हेल्पलाईन, प्रकल्प संचालक आप्पासाहेब उगले आदींसह विविध संस्था, पोलीस अधिकारी आदी उपस्थित होते.