औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळणे अत्यावश्यक झाले आहे. परिणामी, शहरवासी सार्वजनिक वाहनातून प्रवास करण्यापेक्षा स्वतःच्या हक्काच्या वाहनातून सुरक्षित प्रवास करण्यावर भर देत आहेत. यामुळेच वाहन खरेदीसाठी शोरूममध्ये वर्दळ वाढली आहे. दसरा- दिवाळीदरम्यान सुमारे ९ हजार वाहने विक्री होतील, यात २०० कोटींची उलाढाल होईल, असा होरा वितरक व्यक्त करीत आहेत.
दसरा - दिवाळी आधीच शहरात वाहन खरेदीसाठी विविध कंपन्यांच्या अधिकृत वितरकांच्या शोरूमवर ग्राहकांची वर्दळ वाढली आहे. कारण काही कंपन्यांच्या कार खरेदीसाठी कमीतकमी ५ आठवड्यांची वेटिंग आहे. चेंबर ऑफ ऑथोराईज ऑटोमोबाईल डीलर्स संघटनेचे अध्यक्ष राहुल पगरिया यांनी सांगितले की, सप्टेंबर महिन्यात शहरात सर्व कंपन्यांची दुचाकी, चारचाकी मिळून ५५००० वाहने विक्री झाली. शोरूमवर होणारी बुकिंग लक्षात घेता दसरा-दिवाळीदरम्यान ९ हजार नवीन वाहने रस्त्यावर येतील. त्यात १२०० पेक्षा अधिक कारचा समावेश असेल. कार खरेदीत मागील दसरा-दिवाळीच्या तुलनेत १० टक्के वाढ दिसून येत आहे.
शहरात विविध कंपन्यांच्या ४ लाख ते ७५ लाख रुपयांपर्यंतच्या कार उपलब्ध आहेत. त्यात ५ लाख ते १० लाखांदरम्यानच्या कार विक्रीचे प्रमाण ७० टक्के राहील. तसेच शहरात ५० हजार ते १ लाख रुपयांदरम्यान दुचाकी आहेत. त्यापैकी ५० हजार ते ७० हजारांदरम्यानच्या सुमारे ७० टक्के दुचाकी विकल्या जाणार आहेत. ६५ टक्के ग्राहक वित्तसंस्थेकडून कर्ज घेतात. मायलेज जास्त, १२५ सीसीवरील वाहनांवर डिस्काऊंट, कमीत कमी डाऊनपेमेंट व बँकांनी कमी केलेला व्याजदर यामुळे वाहन खरेदीला प्रोत्साहन मिळत आहे.
महिन्याकाठी ३ हजारांवर नोंदणी यंदा एप्रिल ते जुलै या ४ महिन्यांत केवळ ४ हजार ७९७ नव्या वाहनांची आरटीओ कार्यालयात नोंदणी झाली. ही ४ महिने म्हणजे कोरोनाच्या प्रादुर्भाव सुरू होऊन रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होण्याचा कालावधी होता. त्यामुळे वाहन विक्रीवर परिणाम झाला; परंतु जुलैपासून अनेक बाबी अनलॉक होत गेल्या. त्यामुळे वाहन खरेदीकडे नागरिकांचा कल वाढू लागला आहे. ऑगस्टपासून वाहन नोंदणीची स्थिती पूर्वीप्रमाणे होण्यास सुरुवात झाली आहे. एप्रिल ते जुलैच्या तुलनेत वाहन नोंदणीत ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये वाढ झाल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार यांनी सांगितले.
850 नवीन ट्रॅक्टर ग्रामीण भागात दिसतीलग्रामीण भागातून ट्रॅक्टरची मागणी वाढत आहे. सप्टेंबर महिन्यात ६६० ट्रॅक्टर विक्री झाले. यावरून याची प्रचीती येते. दसरा- दिवाळीदरम्यान नवीन ८५० ट्रॅक्टर ग्रामीण भागात धावतील, असेही वितरकांनी सांगितले.
वर्ष २०१९ ची स्थितीएप्रिल ते जुलै या ४ महिन्यांत तब्बल २४ हजार ४७६ नव्या वाहनांची नोंदणी झाली होती, तर ऑगस्टमध्ये ४ हजार ४९, सप्टेंबरमध्ये ३ हजार ९३३ आणि ऑक्टोबरमध्ये ६ हजार ५३१ वाहनांची नोंदणी झाली होती.
वर्ष २०२० ची स्थितीएप्रिल ते जुलै या ४ महिन्यांत सर्व प्रकारच्या केवळ ४ हजार ७९७ नव्या वाहनांची नोंदणी झाली. ऑगस्टमध्ये ३ हजार ११९, सप्टेंबरमध्ये ३ हजार ८४२ वाहनांची नोंदणी झाली आहे.