औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समृद्धी महामार्गाच्या कामावर परिणाम झाला असून, पूर्वीसारखा दीर्घ स्वरूपाचे लॉकडाऊन लागले, तर अडकून पडावे लागेल, या भीतीपोटी अनेक परप्रांतीय मजूर गावाकडे परतण्याच्या तयारीत आहेत. दुसरीकडे, कामासाठी लागणारे अनेक साहित्य बाहेरून आणण्यासाठीदेखील मोठ्या अडचणी येत आहेत.
मागील काही दिवसांपासून राज्यभरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. औरंगाबादसह राज्यातील अनेक महानगरे व जिल्ह्यांमध्ये अंशत: लॉकडाऊन लावण्यात आले आहे. त्याचा मोठा परिणाम समृद्धी महामार्गाच्या कामावर झाला आहे. दरम्यान, कामासाठी आलेले परप्रांतीय मजूरही मोठ्या प्रमाणात धास्तावले आहेत. पूर्वीच्या लॉकडाऊनमध्ये अचानक राज्याच्या सीमा बंद केल्या. वाहनेही बंद करण्यात आली. त्यामुळे हजारो परप्रांतीय मजूर पायी चालत त्यांच्या मूळ गावी परतले होते. यावेळीही दीर्घ स्वरूपाचे लॉकडाऊन जाहीर झाले, तर इथे अडकून पडण्यापेक्षा गावी गेलेले बरे, या मानसिकतेतून अनेक जण परतण्याच्या तयारीत आहेत. महामार्गाच्या कामासाठी लागणारी यंत्रे, लोखंड किंवा अन्य साहित्य आणण्यासाठीही अडचणी येत आहेत. त्यामुळे १५ ते २० दिवसांपासून कामाची गती मंदावली आहे. मात्र, १ मेपासून शिर्डीपर्यंत या महामार्गावरून वाहतूक सुरू करण्याचा शासनाचा संकल्प आहे. त्यानुसार सध्या ६ पैकी एका बाजूच्या ३ लेनचे काम पूर्ण करण्यावर ‘एमएसआरडीसी’ने भर दिला आहे. डिसेंबरअखेरपर्यंत दोन्ही बाजूच्या सर्व लेनचे काम पूर्ण होईल, असे अधीक्षक अभियंता ए.बी. साळुंके यांनी सांगितले.
‘समृद्धी’च्या कनेक्टिव्हिटीला भूसंपादनाचा अडथळा‘डीएमआयसी’साठी शेंद्रा औद्योगिक वसाहतीपासून समृद्धी महामार्गाला कनेक्टिव्हिटी देण्यात येणार आहे. यासाठी अखेर ‘एमएसआरडीसी’ला ४१ कोटी रुपये देण्यास ‘एमआयडीसी’ राजी झाली आहे. ‘समृद्धी’पर्यंत कनेक्टिव्हिटीसाठी लागणाऱ्या ९०० मीटर अप्रोच रस्त्याचे भूसपांदन व रस्त्याचे काम ‘एमआयडीसी’ला करावे लागणार आहे, तर ‘समृद्धी’च्या ठिकाणी ‘इंटरचेंज’चे काम ‘एमएसआरडीसी’ करणार असून, त्यासाठी ८ हेक्टर जागा लागणार आहे. समृद्धी महामार्गासाठी भूसंपादनाकरिता दिलेला पाच पट भाव ‘एमआयडीसी’कडून मिळावा म्हणून शेतकरी अडून बसले आहेत. सध्या ‘एमआयडीसी’ तडजोडीच्या भूमिकेत आहे. भूसंपादनासाठी दोन ते अडीच महिने अवधी लागण्याची शक्यता असून, जमिनीचा ताबा घेतल्यानंतर ‘इंटरचेंज’चे काम साडेतीन महिन्यांत पूर्ण होईल, असे अधीक्षक अभियंता ए.बी. साळुंके यांनी सांगितले.