संतोष हिरेमठ
औरंगाबाद : कोरोना होऊन गेल्यानंतर अनेक रुग्णांना इतर आजारांसाठी शस्त्रक्रिया करावी लागते. अशा वेळी शस्त्रक्रिया नेमकी कधी करावी, असा संभ्रम रुग्णांमध्ये पाहायला मिळत आहे. अनेक रुग्ण भीतीपोटी रुग्णालयातच जात नाही. मात्र, त्यातून आजार गंभीर स्वरुप घेण्याची शक्यता असते. घाटीत इमर्जन्सी असेल तर कोरोनाबाधित रुग्णांचीही शस्त्रक्रिया तत्काळ केली जाते. त्यामुळे कोरोना होऊन गेला म्हणजे शस्त्रक्रिया होणार नाही, असा गैरसमज करू नये. योग्य वेळी आणि डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णांनी शस्त्रक्रिया केली तर पुढील धोका टळू शकतो, असे तज्ज्ञांनी म्हटले.
कोरोनावर यशस्वी उपचार घेऊन घरी परतल्यानंतरही अनेक रुग्णांच्या शरीरात विषाणूचा प्रादुर्भाव कमी-अधिक प्रमाणात राहू शकतो. शिवाय अनेकांना कोरोना झालेला असतो. परंतु त्यांच्यात कुठलीही लक्षणे दिसून आलेली नसतात. अशा रुग्णांची शस्त्रक्रिया करताना वैद्यकीय पथकाला खबरदारी घेणे आवश्यक ठरते. त्यामुळे घाटी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यापूर्वी रुग्णांची कोरोना टेस्ट केली जाते. शस्त्रक्रिया अत्यावश्यक असेल तर ती केली जातेच. अशा वेळी रुग्ण कोरोनाबाधित असेल तर पीपीई किटसह सर्व खबरदारी घेऊन डाॅक्टर्स शस्त्रक्रिया पार पाडतात. शस्त्रक्रिया जर अत्यावश्यक नसेल आणि रुग्ण जर कोरोनाबाधित आढळला तर शस्त्रक्रियेचे नियोजन करून पुढील तारीख दिली जाते.
-----------
- कोरोनाचे एकूण रुग्ण - १,४८,३२२
- एकूण बरे रुग्ण - १,४४,५४८
- एकूण कोरोना बळी - ३,५५१
- सध्या उपचार सुरु असलेले - २२३
------
शस्त्रक्रियेसाठी वाट पहा...
घाटी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यापूर्वी रुग्णाची स्वॅब टेस्ट केली जाते. अहवाल पाॅझिटिव्ह आला आणि इमर्जन्सी शस्त्रक्रिया असेल तर ती केली जाते. परंतु अहवाल पाॅझिटिव्ह आला आणि शस्त्रक्रिया काही कालावधीनंतरही करता येऊ शकत असेल तर ती पुढे ढकलली जाते. कोरोनावर उपचार घेऊन गेल्यानंतरही किमान काही दिवस रुग्णाचा अहवाल पाॅझिटिव्ह येण्याची शक्यता असते. त्यामुळे अत्यावश्यक नसलेल्या शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णाला थोडी वाट पाहावी लागते.
---
इमर्जन्सी शस्त्रक्रिया
- इमर्जन्सी शस्त्रक्रिया म्हणजे तत्काळ करावी लागणारी शस्त्रक्रिया होय. ही शस्त्रक्रिया न केल्यास रुग्णाच्या जिवाला धोका होऊ शकतो.
- डोक्याला मार लागण्याने रक्ताची गाठण होणे, मेंदूत रक्तस्त्राव होणे, पोटात रक्तस्त्राव होणे, आतड्याला छिद्र पडणे, गँगरीन होणे या काही शस्त्रक्रिया या इमर्जन्सी शस्त्रक्रिया आहेत.
----
प्लान शस्त्रक्रिया
-या शस्त्रक्रिया ठरवून, रुग्णाच्या सोयीनुसार करता येतात. कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर अशा शस्त्रक्रिया करता येतात.
- हार्निया, अर्ली स्टेजमधील कर्करोग रुग्णांच्या काही शस्त्रक्रिया या नियोजन करून करण्यात येतात.
---
पीपीई किटसह अत्यावश्यक खबरदारी
शस्त्रक्रिया करण्यापूर्वी रुग्णाची स्वॅब टेस्ट केली जाते. कोरोना पाॅझिटिव्ह आढळला तरी रुग्णाची शस्त्रक्रिया इमर्जन्सी असेल तर ती केलीच जाते. गेल्या काही दिवसांत कोविड पाॅझिटिव्ह रुग्णांच्या अनेक शस्त्रक्रिया केल्या आहेत. अशा वेळी पीपीई किटसह अत्यावश्यक खबरदारी घेतली जाते.
- डाॅ. सुरेश हरबडे, सहयोगी प्राध्यापक, घाटी रुग्णालय