फुलंब्री : कोरोनामुळे रसवंतीगृहे बंद असल्याने तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कमी भावात साखर कारखान्यांना ऊस विक्री करावा लागत आहे. यामुळे आर्थिक फटका बसून शेतकरी अडचणीत आले आहेत.
फुलंब्री तालुक्यात चारशे ऊस उत्पादक शेतकरी असे आहेत की, जे गेल्या काही वर्षांपासून कारखान्यांना ऊस देण्याऐवजी रसवंतीगृहांना ऊस देणे अधिक पसंत करतात. कारण कारखान्यांपेक्षा रसवंतीगृहांना ऊस देणे फायदेशीर ठरते. कारखान्यांना ऊस देताना तोडणीसाठी अडचणी येतात. भाव कमी मिळतो. त्यापेक्षा रसवंतीचालक शेतावर पैसे देतात. यामुळे शेतकऱ्यांना हे परवडते. मात्र यंदा लॉकडाऊनमुळे रसवंतीगृहे बंद असल्याने या शेतकऱ्यांना आपला ऊस कमी भावात कारखान्यांना द्यावा लागत आहे.
चौकट
दोन हजार टन ऊस अडकला
फुलंब्री तालुक्यातून राज्यभरात तसेच बाहेरील राज्यातही मोठ्या प्रमाणात ऊस हा रसवंतीगृहांना पाठविला जातो. पण, यंदा रसवंतीगृहे बंद असल्याने याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे. तालुक्यातून दोन हजार टन उसाची यंदा रसवंती चालकांनी बुकिंग करून ठेवली होती. मात्र लॉकडाऊनमुळे सर्व व्यवस्था ठप्प आहे. चारशे शेतकऱ्यांनी रसवंतीगृहांकरिता बुकिंग करून ठेवलेला ऊस कन्नड व खुलताबाद येथील साखर कारखान्यांना पाठविणे सुरू केले आहे. कारखान्यात उसाला दोन हजार रुपयांपेक्षा कमी भाव मिळतो. मात्र रसवंतीगृहांकरिता जाणारा ऊस अडीच हजार रुपये टन प्रमाणे विकला जातो. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
कोट
फुलंब्री परिसरात रसवंतीगृहांकरिता २ हजार टन ऊस ठेवलेला होता. तो ऊस राज्यातील काही शहरांत व कोलकाता व हैदराबाद येथे पाठविला जाणार होता. बाहेर राज्यात उसाला २ हजार ८०० रुपये प्रतिटन भाव मिळतो. यात शेतकऱ्यांना अडीच हजार रुपये तर मला ३०० रुपये प्रतिटन पैसे मिळतात. यंदा मात्र, सर्व बंद असल्याने नुकसान झाले.
- राऊफ शेख, ऊस ठेकेदार, जानेफळ.
फोटो कॅप्शन : शेतात ऊसतोडणी करताना मजूर.
230421\rauf usman shaik_img-20210423-wa0044_1.jpg
शेतात उस तोडणी करताना मजूर.