औरंगाबाद : मला, माझ्या कुटुंबाला काेरोना होईल का, अशी सतत चिंता करणे...नोकरी गेली, निर्बंधांमुळे व्यवसाय ठप्प झाला, आता कसे होईल...काेरोना झाला तर बेड, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर उफलब्ध होईल का...अशा अनेक कारणांनी नागरिकांना डिप्रेशनला सामोरे जावे लागले. त्यातून मानसिक आजारांवरील औषधांच्या विक्रीत १० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने एकच कहर केला. तब्बल दोन हजारांच्या घरात रुग्णांचे निदान झाले. दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा निर्बंध लावण्याची वेळ ओढवली. त्यामुळे वर्षभराच्या कालावधीत पुन्हा घरातच थांबण्याची वेळ नागरिकांवर आली. अत्यावश्यक कामांसाठीच घराबाहेर पडता आले. या सगळ्यांत अनेकांची नोकरी गेली. व्यवसाय ठप्प राहिल्याने आर्थिक स्थिती ढासळली. त्यातून अनेकांचे मानसिक स्वास्थही बिघडले. डिप्रेशनला सामोरे जावे लागले. मानसिक आजारांतून वेळीच बाहेर पडण्यासाठी समुपदेशन महत्त्वपूर्ण ठरते. परंतु अनेक स्वत: काही तरी झाले आहे, हे स्वीकारतच नाही. त्यातून मानसिक आजार वाढत जातो. उपाचारासाठी रुग्णांचे प्रमाण वाढल्याने औषधांची विक्रीही वाढली.
------
डिप्रेशन का वाढले ?
कोरोना काळात स्वतःला आणि कुटुंबाला आजार होण्याची चिंता नागरिकांना सतावत होती. दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढल्याने कोरोना झाल्यावर योग्य उपचार मिळतील का नाही याची अनिश्चितता वाढली. लाॅकडाऊन, निर्बंधामुळे बेरोजगारी, आर्थिक अडचणीला तोंड द्यावे लागले. यातून बिघडलेले कौटुंबिक वातावरण, प्रत्यक्ष भेटून होणारा संवादाचा अभाव, अशा अनेक कारणांनी डिप्रेशन, चिंतेचे प्रमाण वाढले.
---
डिप्रेशन टाळण्यासाठी काय कराल ?
मनाला आलेली मरगळ, निराशा, उद्विग्नता यातून मार्ग शोधण्यासाठी प्रयत्न करणे. बऱ्याच जणांना यात यश प्राप्त होते. पण काहीजण यातून प्रयत्न करूनही बाहेर पडू शकत नाहीत. त्यावेळी मानसिक आधाराची, मानसिक औषधोपचारांची आणि समुपदेशनाची खूप मदत होते. अडचणीच्या वेळी मदतीसाठी हात पुढे करणे समजूतदारपणाचे लक्षण आहे. मानसिक आधारासाठी कुटुंबातील सदस्य, मित्र, सहकारी, शेजारी कुणाचीही मदत होऊ शकते. सगळ्यात महत्त्वाचे आहे आपले नियमित काम, जीवशैली चालू ठेवणे. व्यायाम योगासने, प्राणायामकडे वळले पाहिजे, असे तज्ज्ञांनी सांगितले.
--
अनेक कारणांनी डिप्रेशन
कोरोना काळात डिप्रेशनच्या रुग्णांत वाढ झाली आहे. आर्थिक बाजू, व्यवसायातील स्थितीसह अनेक कारणांनी डिप्रेशनला सामोरे जावे लागत आहे. अतिरिक्त कामाचा ताण, कुटुंबीयांची काळजी, यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांमध्येही डिप्रेशन पहायला मिळाले. आहार, व्यायामावर भर दिला पाहिजे. फोनवर का होईना, पण कोणाजवळ तरी व्यक्त झाले पाहिजे.
- डाॅ. संजीव सावजी, मनोविकारतज्ज्ञ
-----
मार्ग शोधणे महत्त्वाचे
आहे त्या परिस्थितीत मार्ग शोधणे, हाच समजदारपणा आणि अत्यंत प्रभावी असा मार्ग आहे. अल्पकाळासाठी काही दिवस औषधी घेतल्याने मनाला आलेली निराशा, कमी झालेली ऊर्जा परत येऊन व्यक्ती जोमाने काम करण्यास समर्थ होतो. त्यामुळे उपचार, समुपदेशनाचा लाभ घेतला पाहिजे.
- डाॅ. प्रदीप देशमुख, सहायक प्राध्यापक, मनोविकृतीशास्त्र विभाग घाटी,
------
१० टक्के वाढली
नागरिकांमध्ये उदासीनता आणि चिंतेचे प्रमाण वाढली आहे. त्यामुळे जवळपास १० टक्के औषधींची मागणी वाढली आहे. परंतु ही मागणी तात्पुरती वाढली आहे. औषधी पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत आहे.
-विजयकुमार नांदापूरकर, औषध विक्रेते
----ा