डॉ. मंगला बोरकर
औरंगाबाद : गेल्या वर्षी पेक्षा यंदाच्या कोरोना लाटेत अनेक लहान मुले दिसत आहेत. अर्थात बहुतेकांमध्ये लक्षणे दिसत नाहीत. कुटुंबातील अनेक सदस्यांसोबत त्यांनाही लागण झाल्याचे आढळत आहे. त्यामुळे त्यांच्याकडे अधिक लक्ष द्या, काळजी घ्या अन् संरक्षण करण्याचा सल्ला ज्येष्ठ तज्ज्ञांनी दिला आहे.
लहान मुलांना घरात ठेवणे, पाॅझिटिव्ह आल्यास विलगीकरण करणे, त्यांना मास्क घालायला लावणे गरजेचे आहे. आजी आजोबा असल्यास त्यांच्यापासून लहान मुलांना जास्त प्रमाणात बाधा होऊ शकते. गर्दी केली नाही, मुलांचे व्यवस्थित संरक्षण केले तर मुले कोरोनाबाधित होण्यापासून वाचू शकतात. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी करताना लहान मुलांचा पण विचार करायला हवा. त्यांच्या शाळा, परीक्षांच्या बाबतीत ठोस विचार केला पाहिजे आणि लवकरात लवकर त्यांच्यासाठी लस तयार व्हायला हवी.
योग्य वेळी मुलांचे लसीकरण हवे
कोरोनामुळे नेहमीचे लसीकरण (बीसीजी, पोलिओ, ट्रिपल, गोवर इ.) करण्यात बाधा व्हायला नको. योग्य काळजी घेऊन पालकांनी योग्य वेळी मुलांचे संपूर्ण लसीकरण करुन घ्यायला हवे. जर नेमके त्याच वेळेस बाळाला कोरोना झाला तर १५ दिवस ते १ महिन्यानंतर लस देऊन द्यावी. (पोलिओ, गोवर, धनुर्वात इ.) समतोल आहार आणि इतर प्रतिबंधक लसींमुळे मुलांना कोरोनाला सुद्धा तोंड द्यायला शक्ती मिळेल. या काळात मुलांच्या मानसिक आरोग्याकडे आणि सुरक्षिततेकडे विषेश लक्ष द्यायला हवे. कारण सर्व कुटुंब घरीच असल्यामुळे काही अत्याचार होण्याची सुद्धा शक्यता वाढलेली आढळत आहे.
-डॉ. जयंत बरिदे (माजी प्राध्यापक, रोगप्रतिबंधक शास्त्र)
---
माता पॉझिटिव्ह असेल तर?
नवजात बालकाची माता जर पॉझिटिव्ह असेल तर बाळाची आरटीपीसीआर चाचणी लगेच केली जाते. जर बाळ पाॅझिटिव्ह असेल तर सहसा सौम्य आजार असतो. बाळ पाॅझिटिव्ह असो की निगेटिव्ह, मातेने हात स्वच्छ धुवून, मास्क लावून बाळाला स्तनपान करायला हवे. आईला कोरोना असला, आणि बाळाची चाचणी नकारात्मक आली तर लगेच जन्मत: दिल्या जाणाऱ्या पोलिओ, बीसीजी, हिपेटायटीस बीची लस देऊ शकतो. बाळ पाॅझिटिव्ह आले तर या लसी १५ ते ३० दिवसांनंतर द्याव्यात. घरी गेल्यावर सुद्धा बाळाला काही त्रास झाला (ताप, खोकला आदी) तर डॉक्टरांकडून तपासून घ्यावे. पॉझिटिव्ह असलेल्या माता व बाळाने घरी विलगीकरणात रहावे.
-डाॅ. एल. एस. देशमुख (प्राध्यापक नवजात शिशू विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय औरंगाबाद)
---
लहान मुलांमध्ये लक्षणे दिसत नाहीत
लहान मुलांना कोरोना झाल्यास सहसा लक्षणे नसतात, सौम्य असतात, पण ते व्हायरस पसरवू शकतात. सौम्य आजार असल्यास एक्स रे किंवा रक्ताच्या चाचण्या करण्याचीही गरज नाही. ताप असल्यास पॅरासिटॅमाॅल द्यावे. पाच दिवसानंतर ताप येत राहिला, अंगावर पुरळ दिसली, खाणे पिणे कमी झाले, खोकला, दम लागल्यास लगेच डाॅक्टरांना दाखवा. क्वचित गंभीर आजार होऊ शकतो. स्वत: मास्क घालून मुलांना मास्क घालायला लावणे, हात धुणे, सुरक्षित अंतर राखणे, घरातच खेळणे, वाचणे, इ. ची शिकवण द्यावी.
-डाॅ. प्रभा खैरे (प्राध्यापक, बालरोग विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय औरंगाबाद)