औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग वाढत असून, सर्व काही आलबेल असल्यासारखे वागल्यास सर्वांचे नुकसान होईल. कोरोनासाठी घालून दिलेले नियम जर पाळले नाहीतर लॉकडाऊन करावे लागेल, असा इशारा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सोमवारी दिला.उद्योजक, व्यापारी, हॉटेल, पेट्रोल पंप असोसिएशन, रिक्षा युनियन, बाजार समितीच्या पदाधिकारी आणि प्र.जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय आदींची अधिकाऱ्यांची बैठकीला उपस्थिती होती.
आयुक्त केंद्रेकर यांनी उद्योजक संघटनांना गांभीर्याने नियम पाळण्याचे आवाहन केले. त्यांना कामगारांची आरटीपीसीआर चाचणी करण्यास सांगितले. दुकानदारांना दर अर्ध्या तासाने काैंटर सॅनिटायझर करण्यासह ग्राहकांची थर्मल गनने तपासणी करण्याच्या सूचना केल्या आहेत. नियम पाळले नाही तर दुकान सील करण्याचा इशारा बैठकीत महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना दिला. दोन प्रवाशांच्यावर प्रवासी रिक्षांमध्ये बसवू नका. परिस्थिती नाजूक आहे, रिक्षाचालकांचे हातावरचे पोट आहे, पण नियम पाळले तर सर्वांसाठी चांगले राहील. पेट्रोल पंप चालकांनी विनामास्क कुणालाही पेट्रोल देऊ नये, अशा सूचना केल्या आहेत. लहान-मोठ्या हॉटेलचालकांना गुन्हा दाखल करण्याची तंबी दिली आहे. मोठ्या हॉटेल्समध्ये नियम पाळले जात आहेत; परंतु लहान हॉटेलचालक मस्तवालपणे काहीही काळजी घेत नसल्याचे दिसत आहे. शहराबाहेरील हॉटेल्समध्ये गर्दी असून, त्या गर्दीकडे कुणाचेही लक्ष नाही. त्यावर पाळत ठेऊन कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी यंत्रणांना दिले.
उद्योजकांना सुनावले खडे बोलउद्योग संघटनांच्या दोन बैठका झाल्या असून, त्यांनादेखील आयुक्तांनी खडे बोल सुनावल्याचे सूत्रांनी सांगितले. उद्योजकांना सविस्तर सूचना दिल्या आहेत. उद्योगांमध्ये आलबेल सुरू असल्याचे वातावरण आहे. कामगारांची तपासणी बंद केली आहे. सॅनिटायजर वापरणे बंद केले आहे. उद्योजकांची परिस्थिती नाजूक आहे. जर पुन्हा लॉकडाऊन केले तर अर्थकारण कोलमडेल, त्यामुळे आरटीपीसीआर चाचण्या करण्यासाठी एखादी लॅब उद्योजकांनी स्थापन केली पाहिजे. लॉकडाऊन होणार नाही, याची काळजी घ्या. उद्योगांनी कोरोना संपल्याप्रमाणे सर्व काही बंद करून ठेवले आहे. सगळे काही आलबेल आहे, अशा पद्धतीने वागू नका. कामगारांसह त्यांच्या कुटुंबांचीदेखील काळजी घ्यावी लागेल. कामगारांना नेणाऱ्या बसमधील सोशल डिस्टन्सिंग पाळले पाहिजे.
हॉटेल असोसिएशनची माहिती अशीजिल्हा हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी सांगितले, आता जवळपास सर्व कार्यक्रम कमी गर्दीचे होत आहेत. सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे, सॅनिटायझर वापरणे बंधनकारक केले आहे. शहराबाहेरील विनापरवाना अनधिकृत हॉटेल्समध्ये कारवाई करण्यासाठी पथक स्थापन करण्यात येणार आहे. हरप्रितसिंग निऱ्हे, वीरजी, अनु कपूर, किशोर शेट्टी आदींची बैठकीला उपस्थिती होती.