गल्ले बोरगावसह ग्रामीण भागातील बाजारपेठ, बसस्थानक परिसरात ज्यूस, शीतपेय व्यवसाय, रसवंतीची दुकाने थाटू लागतात. मात्र, यंदाही कोरोनाचे संकट असल्याने व्यवसायाचे बारा वाजले.
उन्हाळ्याच्या चार महिन्यांत वर्षभराचे उत्पन्नाचे नियोजन शीतपेय व्यावसायिक दरवर्षी करून ठेवतात. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात बसस्थानक, आठवडी बाजार परिसर, नवीन बायपास परिसरासह आदी भागात शीतपेयांची दुकाने सुरू झाली.
स्थानिक व्यावसायिकांनी आइस्क्रीम, लस्सी विक्रेत्यांनीही आपली दुकाने थाटली. मात्र, गेल्या १५ दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे शीतपेयाच्या विक्रीत कमालीची घट झाली आहे. मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांत नागरिक थंडपेय दुकानांमध्ये गर्दी करतात. मात्र, गल्ले बोरगाव परिसरासह इतर ठिकाणी सध्या या दुकानांकडे कोरोनाच्या भीतीने ग्राहकांनी पाठ फिरविली आहे.
---- प्रतिक्रिया ---
उन्हाळ्याचे हे दिवस आमच्या कमाईचे असतात. मात्र, पुन्हा एकदा अंशतः लॉकडाऊनमुळे आइस्क्रीम, ज्यूसची मागणी घटली आहे. यासह वाहतुकीच्या समस्येमुळे मालाची आयात करणेही अवघड होऊन बसले आहे.
- अमोल भोजने, शीतपेय विक्रेता, गल्ले बोरगाव