औरंगाबाद : कोरोना झाला की, रेमडेसिविर इंजेक्शन द्या, असा प्रकार सध्या सर्रास सुरू आहे. कधी नातेवाईकच आग्रह धरतात, तर आरोग्य वर्तुळातही हे इंजेक्शन कोणत्या रुग्णाला आणि कधी द्यायचे, याविषयी वेगवेगळी मते आहेत. त्यामुळे अनेकदा गरज नसतानाही रुग्णांवर रेमडेसिविरचा मारा होत आहे. मात्र, कोरोना झाला म्हणजे ‘रेमडेसिविर’ द्या, हे चुकीचे असल्याचे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले आहे.
कोराेना रुग्णांवर सध्या रेमडेसिविर इंजेक्शन प्रभावी असल्याचे मानले जात आहे. राज्यभरात या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. नातेवाईकांची हे इंजेक्शन मिळविण्यासाठी धडपड सुरू आहे. सुदैवाने औरंगाबादेत ही परिस्थिती नाही. मात्र, कोरोना झाला की, रुग्णांचे नातेवाईक स्वत:हूनच रुग्णाला रेमडेसिविर द्या, असा आग्रह धरण्याचा प्रकार वाढत आहे. डाॅक्टरांनी नाकारल्यानंतरही, दबाव टाकून हे इंजेक्शन देण्यासाठी भाग पाडले जात असल्याची परिस्थिती आहे. दुसरीकडे काही डाॅक्टरही एचआरसीटी स्कोर समोर करून रुग्णांना रेमडेसिविरचा सल्ला देत आहेत. परंतु ८० टक्के रुग्ण या इंजेक्शनविना बरे होतात. ‘एचआरसीटी’पेक्षा ऑक्सिजन पातळी अधिक महत्त्वाची असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. ऑक्सिजन पातळी कमी असलेल्या रुग्णांना रेमडेसिविर उपयोगी ठरू शकते, असे सांगितले.
जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. एस. व्ही. कुलकर्णी यांनी रेमडेसिविर कोणत्या रुग्णाला देणे गरजेचे आहे, हे स्पष्ट केले. नातेवाईकांनी स्वत:हून हे इंजेक्शन देण्याचा आग्रह धरू नये, असेही त्यांनी सांगितले.
----
रुग्णाची स्थिती अशी असेल तर...
- एचआरसीटी स्कोर ० ते ७ असेल, तर रेमडेसिविर देणे गरजेचे नाही
- एचआरसीटी स्कोर ८ ते १४ असेल, तर फॅबी फ्लूच्या गोळ्या.
- एचआरसीटी स्कोर ८ ते १४ असलेल्या रुग्णांना ७ दिवसात ६६ फॅबी फ्लूच्या गोळ्यांचा डोस.
-----
रेमडेसिविर कोणाला ?
- ऑक्सिजन पातळी ९४ च्या खाली असेल तर.
- एचआरसीटी स्कोर १५ च्या पुढे असेल तर.
- तीन दिवस सलग तीव्र ताप.
- रुग्णाला अति अशक्तपणा.
------