- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या पाचावर गेली असून, तेलंगणा येथे या विषाणूचा रुग्ण आढळून आला आहे. कोरोना अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपल्याने मराठवाड्यातील आरोग्य यंत्रणा ‘हाय अलर्ट’ झाली आहे. जनजागृतीसह जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सकांना खबरदारीसह आरोग्य व्यवस्था चोख ठेवण्याची सूचना देण्यात आल्या आहेत.
मर्स, सार्स यासारख्या गंभीर आजारास कारणीभूत असणाऱ्या एका विशिष्ट प्रकारच्या विषाणू गटास कोरोना विषाणू म्हटले जाते. २००३ साली आढळलेला सार्स हादेखील एक प्रकारचा कोरोना विषाणूच होता. सध्या चीनमधील उद्रेकात आढळलेला विषाणूही कोरोना विषाणूच आहे. केवळ त्याची जनुकीय रचना पूर्णपणे नवीन असल्याने त्यास ‘नॉव्हेल कोरोना विषाणू’ असे नाव देण्यात आले आहे. तेलंगणात एकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून सतर्क ता बाळगली जात आहे. जिल्हा रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मनपा यांना कोरोना विषाणूसंदर्भात मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार विविध उपाययोजना केल्या जात आहेत.
जिल्हा रुग्णालयात विशेष वॉर्ड, व्हेंटिलेटरची व्यवस्थाआरोग्य विभागातर्फे रु ग्णालयांत हात धुण्याची व्यवस्था, जैव वैद्यकीय कचऱ्याच्या सुयोग्य विल्हेवाटीचे नियोजन करण्यात आले आहे. गंभीर रुग्ण आढळून आल्यास व्हेंटिलेटर, जीवनावश्यक प्रणालीची व्यवस्था सक्षमपणे कार्यरत ठेवण्यावर भर दिला जात आहे. त्यानुसार चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात विशेष वॉर्ड तयार करण्यात आला आहे. ४४ व्हेंटिलेटरची व्यवस्था ठेवण्यात आली. रुग्णालयात जनजागृतीपर पोस्टर्स लावण्यात आली आहेत. आवश्यक ती खबरदारी घेतली जात असल्याचे अतिरिक्त जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी सांगितले. एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमांमार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे. कोरोनाच्या निदानाची व्यवस्था पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत उपलब्ध आहे. संशयित रुग्णाचे नमुने निदानासाठी पाठविताना जिल्हा शल्यचिकित्सकांची परवानगी घेण्याची सूचना करण्यात आली आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी असली तरी सर्वेक्षण, निदान आणि उपचार व्यवस्था सक्षम करण्यावर भर देण्यात आला. आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे म्हणाले, प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सकांना खबरदारीच्या सूचना दिलेल्या आहेत. आरोग्य विभाग सज्ज आहे. मात्र, नागरिकांनी घाबरून जाण्याचे काही कारण नाही. कोणत्याही प्रकारे भीतीचे वातावरण असता कामा नये. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांद्वारे नागरिकांमध्ये आरोग्य संदेशही दिले जात आहेत.
घाटी रुग्णालयात विशेष कक्षघाटी रुग्णालयात मराठवाड्यासह लगतच्या भागातून रुग्ण उपचारासाठी येतात. गेल्या महिनाभरापासून याठिकाणी दक्षता घेण्यात येत आहे. याठिकाणी कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्याच्या दृष्टीने मेडिसिन विभागातील वॉर्ड क्रमांक-५ मध्ये विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. चार खाटा आरक्षित करून खबरदारीची पावले उचलली आहेत. एखादा संशयित रुग्ण आढळल्यास त्यावर उपचारासाठी घाटी प्रशासनाने तयारी केली आहे. आवश्यक ती खबरदारी घेतली जात असल्याचे मेडिसिन विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी सांगितले. रुग्णाच्या उपचारासाठी मास्कसह पर्सनल प्रोटेक्टिव्ह डिव्हाईस (पीपीडी) लागतात. त्याची मागणी प्रशासनाकडे के ली आहे. त्याची प्रतीक्षा केली जात आहे. टॅमी फ्लूसह इतर ११ प्रकारच्या औषधी पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहतील, यावर भर दिला जात आहे.
मनपा घेणार रुग्णालयांची बैठककोरोनाविषयी महापालिकेकडूनही खबरदारी घेतली जात आहे. आरोग्य केंद्रामध्ये येणाऱ्या नागरिकांमध्ये जनजागृती केली जात असून, आवश्यक ती खबरदारी घेण्याची सूचना करण्यात येत आहे. मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर म्हणाल्या, शहरातील खाजगी, शासकीय रुग्णालयांची पुढील आठवड्यात बैठक घेतली जाणार आहे. एखादा रुग्ण आढळल्यास कोणकोणत्या रुग्णालयात उपचार शक्य होतील, याचा आढावा घेतला जाणार आहे. परदेशातून शहरात येणाऱ्यांवरही लक्ष ठेवले जात आहे. पोस्टर, बॅनर्सद्वारेही नागरिकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. सध्यातरी कोणतीही गंभीर परिस्थिती नाही.
कोरोनाची सर्वसामान्य लक्षणे- सर्दी, खोकला, घसा बसणे.- गंभीर स्वरूपाची श्वसन संस्थेची लक्षणे.- श्वास घेण्यास त्रास होणे, श्वासात अडथळा.- अचानक तीव्र ताप. - न्यूमोनियाची लक्षणे- काही रुग्णांत मूत्रपिंड निकामी होणे.- प्रतिकारशक्तीची कमतरता असलेल्या व्यक्तींत असामान्य लक्षणे.- रुग्णालयात भरती करण्याची आवश्यकता वाटणे.- अतिसार - पचनसंस्था बिघाडाची लक्षणे- रुग्णांना अति थकवा जाणवतो, त्यामुळे अशक्तपणा येतो
नागरिकांनी घ्यावी ही खबरदारी- हातांची नियमित स्वच्छता.- न शिजविलेले अथवा अपुरे शिजविलेले मांस खाऊ नये.- फळे, भाज्या न धुता खाऊ नयेत.- खोकलताना, शिंकताना नाका-तोंडावर रुमालचा वापर करावा.- खोकलताना वापरलेले टिश्यू पेपर झाकण असलेल्या कचरा पेटीत टाकावे.- श्वसनास त्रास होत असेल, तर वैद्यकीय सल्ला घ्यावा.- विषाणूबाधित देश, भागातून प्रवास केलेल्यांनी वैद्यकीय तपासणीसाठी वैद्यकीय सल्ला घ्यावा.
मास्कचा पुरेसा साठामास्कचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. घाटी रुग्णालयातही मास्क उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.