औरंगाबाद : ऑक्सिजनवर असलेला कोरोना रुग्ण स्वच्छतागृहात गेला. मात्र, अचानक स्वच्छतागृहातच रुग्णाची प्रकृती खालावली. बराच वेळ झाल्यानंतरही रुग्ण बाहेर आला नसल्याचे लक्षात येताच दरवाजा तोडून रुग्णाला बाहेर काढून आयसीयूत हलविण्यात आले. मात्र, दुर्दैवाने रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे जिल्हा सामान्य रुग्णालयात घडली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला.
गुलाबराव ढवळे (६५, रा. जयभवानीनगर) असे मत रुग्णाचे नाव आहे. कोरोनाच्या उपचारासाठी त्यांना २७ मार्च रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णालयात दाखल होतानाच ऑक्सिजनची पातळी कमी होती. त्यामुळे ते ऑक्सिजनवर होते. सोमवारी पहाटे ते स्वच्छतागृहात गेले. त्यांना स्वच्छतागृहात जाऊन खूप वेळ झाला, तरीही ते बाहेर आले नसल्याची बाब अन्य रुग्ण, कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली. त्यांनी स्वच्छतागृहाचा दरवाजा वाजविला. परंतु आतून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे दरवाजा तोडून त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आले. परंतु सकाळी ७.४० वाजता त्यांचा मृत्यू झाला.
नातेवाइकांचा आरोप, पहाटे २ ते ६ वाजेपर्यंत स्वच्छतागृहातच पडून...
स्वच्छतागृहात वडील पहाटे २ वाजता गेले, पण सकाळचे ६ वाजूनही ते बाहेर आले नसल्याचे अन्य रुग्णांनी फोनवर सांगितले. त्यामुळे सकाळी मी रुग्णालयात गेलो. तेव्हा दरवाजा तोडून वडिलांना बाहेर काढले. आयसीयूत दाखल केले, पण त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी लक्ष दिले नाही. कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच ही दुर्दैवी घटना घडली आणि वडिलांचा मृत्यू झाला. याप्रकरणी दोषी असलेल्या कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, त्यांना निलंबित करावे, अशी मागणी रुग्णाचा मुलगा नीलेश ढवळे यांनी केली आहे.
उपचारादम्यान मृत्यू
सदर रुग्ण पहाटे ५.३० वाजता स्वच्छतागृहात गेला होता. सकाळी ६ वाजेपर्यंतही ते बाहेर आले नाही. ही बाब लक्षात येताच दार तोडून त्यांना बाहेर काढले. तेव्हा आधारासह खाटेपर्यंत ते चालत आले. त्यांच्यावर आयसीयूत तत्काळ उपचार करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यांना व्हेंटिलेटरही लावण्यात आले. पण त्यांचा मृत्यू झाला.
- डाॅ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक