औरंगाबाद : जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यांत कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली. मृत्यूचे प्रमाणही वाढले. मात्र, जिल्ह्यातील मृत्युदरात घट झाली आहे. विशेष म्हणजे राज्याचा आणि जिल्ह्याचा मृत्युदर जवळपास सारखाच आहे.
जिल्ह्यात ऑक्टोबर ते जानेवारीपर्यंत कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली होती. परंतु फेब्रुवारी महिना उजाडताच कोरोना रुग्णांत झपाट्याने वाढ सुरू झाली. गेल्या दीड महिन्यांत ११ हजारांवर नव्या कोरोना रुग्णांची जिल्ह्यात भर पडली. त्यापाठोपाठ पुन्हा एकदा कोरोनाच्या रोजच्या मृत्यूचक्राला सुरुवात झाली आहे. मागील दीड महिन्यांत १०६ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. कोरोना रुग्ण, मृत्यू वाढत असले तरी जिल्ह्याच्या मृत्युदरात मात्र घट झाली आहे. दीड महिन्यांत मृत्युदर २.६३ टक्क्यांवर २.२८ टक्क्यांवर घसरला आहे. राज्याचा मृत्युदर २.२७ टक्के आहे. त्यामुळे राज्याचा आणि जिल्ह्याचा मृत्युदर सारखाच आहे. कोरोनाविरुद्ध खासगी असो अथवा शासकीय रुग्णालये, सर्वजण कोरोना लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुन्हा एकदा एकत्रितपणे लढा देत आहेत. या परिस्थितीवर नियंत्रण कसे आणायचे आणि मृत्यू कसे रोखायचे, असा प्रश्न आरोग्य यंत्रणेलाही पडत आहे.
जिल्ह्यातील कोरोना स्थिती
१) मृत्युदर
१ फेब्रुवारी - २.६३ टक्के
१५ मार्च - २.२८ टक्के
------
राज्याचा मृत्युदर-२.२७ टक्के
जिल्ह्यात १ फेब्रुवारी ते १५ मार्चदरम्यान १०६ मृत्यू, ११,८१६ नवे रुग्ण.