पैठण : कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीचे नाव व्हाट्सएप ग्रुपवर व्हायरल करणाऱ्या तरूणाच्या विरोधात पैठण पोलीस ठाण्यात आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पैठण शहरातील एका भागातील व्यक्तीची कोरोना चाचणी आज पॉझिटिव्ह आली. यानंतर स्थानिक सोशल मिडियातून ही बातमी मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली. दरम्यान, पैठण येथील डायनॅमिक काँम्पुटर नावाच्या व्हाट्सएप ग्रुपचा सदस्य असलेल्या ब्रम्हा भोसले याने सदरील कोरोना रूग्णाचे स्पष्ट नाव टाकून या ग्रुपवर पोस्ट टाकली. विशेष म्हणजे या पोस्टच्या शेवटी पैठण तहसीलदार यांचे नावही टाकले होते.
या बाबत तहसील कार्यालयातील अव्वल कारकून अशोक दत्तात्रय जाधव यांनी पैठण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून ब्रम्हा भोसले याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल गोपाळ पाटील पुढील तपास करीत आहेत.