औरंगाबाद : घाटीतील सुपर स्पेशालिटी ब्लॉकच्या चौथ्या मजल्यावरील आयसीयूमध्ये डॉक्टरांचा राऊंड सुरू असतानाच पैठण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असलेल्या कोरोनाच्या रूग्णाने खिडकीतून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी स. ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. बेडपॅन घेऊन खाटेजवळचा पडदा झाकून कोणाला काही कळण्याच्या आतच उडी मारून त्यांनी जीवन संपविले.
काकासाहेब कणसे (४२ वर्षे, धनगाव, ता. पैठण) असे मयत रूग्णाचे नाव आहे. घाटीत दि. २१ सप्टेंबर रोजी ते उपचारासाठी दाखल झाले होते. ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने त्यांच्यावर सुपर स्पेशालिटी ब्लॉकच्या चाैथ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. नेहमीप्रमाणे रविवारी स. ७ वाजेच्या सुमारास डॉक्टरांचा याठिकाणी राऊंड सुरू होता.
डॉक्टर रूग्णांच्या प्रकृतीची तपासणी करीत होते. तर परिचारिका औषधी देत होत्या. त्याचवेळी काकासाहेब यांनी पाणी मागितले. डॉक्टरांनी त्यांना पाणी दिले. पाणी पिल्यानंतर त्यांनी बेडपॅनची मागणी केली असता एका सफाई कर्मचाऱ्याने त्यांना बेडपॅनही दिले. काकासाहेब यांनी शौचासाठी खाटेभोवतीचा पडदा लावून घेतला. तेव्हा तो कर्मचारी थोडा दूर उभा होता. त्यानंतर अवघ्या १० मिनिटातच जोरदार आवाज झाला असता कर्मचाऱ्याने पडदा सरकावून आतमध्ये पाहिले असता काकासाहेब खाटेवर नव्हते. खिडकीही उघडी होती.
याविषयी त्याने तात्काळ एका ब्रदरला महिती दिली. ब्रदरनेही रूग्णाच्या खाटेजवळ धाव घेतली. त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले तेव्हा खाली कोसळलेल्या रूग्णाची अवस्था पाहून दोघांच्याही काळजाचा ठोका चुकला. या घटनेची माहिती तात्काळ निवासी वैद्यकीय अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांना देण्यात आली. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, उपअधिष्ठाता डॉ. कैलास झिने, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे, डॉ. सुधीर चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी एमएलसी नोंदविली.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
रूग्णालयात दाखल झाल्यानंतर कणसे हे मानसिक ताणाविषयी डॉक्टरांशी काहीही बोलले नव्हते. एखाद्या रूग्णाने मानसिक ताणाविषयी सांगितले तर त्याचे तात्काळ समुपदेशन करण्यात येते. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असल्याचे डॉ. येळीकर यांनी सांगितले. तसेच याप्रकरणी कोणाची चूक दिसत नसल्याने सध्यातरी कोणावर कारवाई होणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.