औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा एकदा झपाट्याने प्रसार होत आहे; परंतु हा प्रसार औरंगाबाद शहरातच सर्वाधिक आहे. नव्याने आढळलेले ९२ टक्के रुग्ण शहरातीलच आहेत. ग्रामीण भागाने आतापर्यंत कोरोनाला बऱ्यापैकी रोखले आहे. मात्र, ग्रामीण भागातून शहरात ये-जा करण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे यापुढे ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार होण्यापासून रोखण्याचे आव्हान आरोग्य यंत्रणेपुढे राहिले आहे.
एकीकडे ग्रामीण भागातील विरळ लोकवस्तीमुळे कोरोचा प्रसार होत नाही, तर दुसरीकडे दाट लोकवस्तीचा शहराला फटका बसत आहे. शहरातील सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी, मास्क, सोशल डिस्टन्सच्या पालनाकडे दुर्लक्षाने काेरोना वाढीला हातभार लागत असल्याचे आरोग्य यंत्रणेचे म्हणणे आहे. जिल्ह्यात बुधवारपर्यंत सक्रिय म्हणजे रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या एक हजार ३१२ होती. यात ग्रामीण भागांतील रुग्णांची संख्या केवळ ११२ आहे. त्याउलट शहरातील रुग्णांची संख्या १२०० आहे. जिल्ह्यातील एकूण नव्या रुग्णांपैकी ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या केवळ ८ टक्के आहे. ही परिस्थिती कायम राहण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून प्रयत्न सुरू आहेत.
विरळ लोकसंख्येचा फायदा
जिथे लोकांचा समूह अधिक, तिथे संसर्गाची अधिक भीती असते. ग्रामीण भागात लोकसंख्या ही विरळ असते. त्यामुळे तेथे संसर्ग होण्याचे प्रमाण हे कमी दिसते; परंतु ग्रामीण भागातून शहरात ये - जा होत असते. त्यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका हा तिथेही असतो. नागरिकांनी मास्क, सोशल डिस्टन्सचे पालन करावे, गर्दीत जाण्याचे टाळले पाहिजे.
-डॉ. स्वप्नील लाळे, आरोग्य उपसंचालक
शहरातील पॉझिटिव्हिटी रेट १५ टक्क्यांवर
शहरातील पॉझिटिव्हिटी रेट बुधवारी १५.४२ टक्के झाला. ६ फेब्रुवारी रोजी पॉझिटिव्हिटी रेट केवळ ४.५० टक्के होता.
शहर व ग्रामीण भागातील स्थिती (२४ फेब्रुवारीपर्यंत)
जिल्ह्यातील एकूण रुग्ण-४९,२९१
शहरातील एकूण रुग्ण- ३३ ,०३७
ग्रामीण भागातील एकूण रुग्ण-१६,२५४
शहरात सक्रिय रुग्ण-१२००
ग्रामीण भागात सक्रिय रुग्ण-११२