वैजापूर : तालुक्यातील चोर वाघलगाव येथील एका वृद्धाला कोरोना झाल्याचे सांगून आधार हाॅस्पिटलने संबंधितांकडून उपचाराचा खर्च म्हणून तब्बल सव्वा लाख रुपये वसूल केल्याचा प्रकार पुढे आला आहे. याबाबत रुग्णाच्या मुलाने तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी आणि पोलीस निरीक्षक, वैजापूर यांच्याकडे तक्रार केली आहे. आधार हाॅस्पिटलकडे कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी नसताना त्यांनी उपचार केल्याचे समोर येत आहे. चोर वाघलगावच्या लक्ष्मण विनायक मोईन (६०) यांना त्रास होत असल्याने त्यांना नातेवाईकांनी २३ मार्चला आधार हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. या दरम्यान त्यांचे सीटी स्कॅन करत डॉक्टरांनी त्यांना कोरोना झाल्याचे सांगून उपचारासाठी दाखल करून घेतल्याचे मोईन यांचे म्हणणे आहे. नऊ दिवसातील उपचारांचा खर्च म्हणून हॉस्पिटलने आमच्याकडून तब्बल एक लाख ३५ हजार रुपये वसूल केले. या उपचारांची पक्की बिले मागितली असता, त्यांनी दिली नसल्याची तक्रार मोईन यांनी केली आहे. आधार हॉस्पिटलने आमची फसवणूक केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून इतर रुग्णांची आर्थिक पिळवणूक थांबवावी, अशी मागणी मोईन यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोना झाल्याचे सांगून सव्वा लाख वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 4:05 AM