सोयगाव : तालुकास्तरावरील कोणत्याही शासकीय कार्यालयात अभ्यागतांना प्रवेश करण्यासाठी सोमवारपासून बंधने घालण्यात आली आहेत. कार्यालयात जायचे किंवा अधिकाऱ्यांची भेट घ्यायची असेल, तर आता पूर्वपरवानगी आणि ४८ तासांत कोरोना चाचणीचा केलेला अहवाल आवश्यक राहणार आहे. या किचकट आदेशाने ग्रामीण भागातील नागरिकांची चांगलीच गोची होणार आहे.
संचारबंदी लागू करूनही फायदा होत नसल्याने प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. कोणत्याही शासकीय कार्यालयात जाण्यासाठी आता पूर्वपरवानगी आवश्यक असून कोरोना चाचणी अहवाल दाखविल्यानंतरच प्रवेश मिळणार किंवा अधिकाऱ्यांची भेट होणार आहे. यामुळे अनेक कामे असलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. या आदेशानुसार पोलीस ठाण्यात मात्र असे निर्बंध लागू नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहेत. सोमवारपासून या आदेशाची अंमलबजावणी सुरू होईल. एकदम कोरोना अहवाल व पूर्वपरवानगी मिळणार नसल्याने सोमवारी शासकीय कार्यालयांचे दरवाजे अभ्यागतांसाठी बंदच राहणार आहे. शासकीय कार्यालयांतील ५० टक्के उपस्थितीबाबत कोविड-१९ च्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी चालू ठेवायचे असल्यास कार्यालय प्रमुखांच्या निर्णयानुसार १०० टक्के क्षमतेने सुरू ठेवून संबंधितांनी ओळखपत्र लावणे अनिवार्य राहील.