औरंगाबाद - एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील पुन्हा एकदा लॉकडाऊन नियमावलींचा भंग केल्यामुळे वादात सापडले आहेत. विशेष म्हणजे यावेळी त्यांच्यावर चक्क नोटांची उधळण झाली असून कव्वालीच्या कार्यक्रमात कोरोनाचे नियम खासदार महोदयांनीच धाब्यावर बसवल्याचे दिसून येत आहेत. जलील यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, त्यांच्यावर नोटांची उधळण होत असताना दिसून येते.
राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी अद्याप भीती कायमच आहे, त्यातच तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने राज्य पूर्णपणे अनलॉक करण्यात आले नाही. त्यामुळे, सार्वजनिक कार्यक्रम, पार्ट्या आणि हॉटेल्संना रात्रीची बंदी घालण्यात आली आहे. मात्र, खासदार इम्तियाज जलील यांच्यासाठीच हे नियम भंग करुन कायद्याचे उल्लंघन करण्यात आल्याचे दिसून येत आहे.
औरंगाबादच्या दौलताबाद रस्त्यावरील रिसॉर्टमध्ये शनिवारी मध्यरात्री पर्यंत हा कार्यक्रम सुरु होता. खासदार जलील यांचा कार्यक्रमातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. येथे विकेंड लॉकडाऊन असतानाही रात्रीचा कव्वाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे या कार्यक्रमातील उपस्थितांनी मास्कही घातला नव्हता, तसेच 100 पेक्षा जास्त लोकांनी गर्दी केल्याचेही व्हिडिओत पाहायला मिळत आहे. यापूर्वीही झाला होता नियमांचा भंग
दरम्यान, यापूर्वी ३१ मार्च ते ९ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली होती. जिल्ह्यातील प्रस्तावित लॉकडाऊन अंमलबजावणी होण्याच्या २ तास आधी जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केला. यामुळे लॉकडाऊनला तीव्र विरोध असणाऱ्या खासदार इम्तियाज जलिल यांनी समर्थकांसोबत रात्री १०. ४५ वाजेच्या दरम्यान रस्त्यावर जल्लोष केला. यावेळी कोरोना नियम आणि संचारबंदीचे उल्लंघन केल्याने खा. जलील यांच्याविरोधात सिटीचौक ठाण्यात बुधवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.