औरंगाबाद : महापालिकेच्या चिकलठाणा येथील मेलट्राँन कोविड सेंटर येथे गतवर्षी जून महिन्यात कोविड १९ आजारांवर उपचार घेतल्याचे बनावट कागदपत्रे सादर करून सहाजणांनी विमा कंपनीची ४ लाख ६२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी विमा कंपनीच्या अधिकाऱ्याने एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री फसवणुकीची तक्रार नोंदवली.
असित जगदीश वाघ, अमोल हनुमंतराव रामसिंग, किशनलाल, लक्ष्मणलालाजी, गणेश काकासाहेब कडू आणि दोन महिला अशी विमा रक्कम उचलणाऱ्या आरोपींची नावे आहेत, तर या आरोपींना महापालिकेच्या मेलट्राँन कोविड सेंटरमध्ये उपचार घेऊन डिस्चार्ज देण्यात आल्याची कागदपत्रे आरोपी इंदलसिंग भाऊसिंग राजपूत, इम्रान शेख मुश्ताक (रा. पैठण गेट), प्रवीण प्रभाकर पवार (रा. देऊळगाव राजा, बुलडाणा) यांनी तयार करून देत कटात सहभाग नोंदविला.
पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार जाहीरखान अजगर खान हे कोटक जनरल इन्शुरन्स कंपनीचे जोखीम आणि नियंत्रण मुख्य व्यवस्थापक आहेत. आरोपी असित, अमोल, किशनलाल आणि दोन महिलांनी कंपनीकडून विमा उतरविला होता. त्यांनी कोविड महामारीमध्ये कोविड-१९ची लागण झाल्याने चिकलठाणा येथील मनपाच्या मेलट्राँन कोविड सेंटरमध्ये उपचार घेतल्याचा कागदपत्रासह विमा दावा कंपनीला सादर केला.
कंपनीने त्यांचा दावा मंजूर करीत त्यांना ४ लाख ६२ हजार रुपये अदा केले. ही फसवणूक ७ जून २०२१ ते १२ जानेवारी २०२२ दरम्यान झाली. दरम्यान, कंपनीचे मुख्य व्यवस्थापक जहागीर यांनी या कागदपत्राची पडताळणी केली असता ती बनावट असल्याचे त्यांना समजले. आरोपींनी कट रचून कोविड सेंटरमध्ये उपचार घेतल्याची आणि डिस्चार्ज कार्ड बनावट तयार करून विम्याची रक्कम उचलल्याचे स्पष्ट झाले. या फसवणुकीविषयी कंपनीने आरोपी विरोधात दिलेल्या तक्रारीची दखल घेत फसवणुकीचा गुन्हा नोंदविला. पोलीस निरीक्षक विठ्ठल पोटे तपास करीत आहेत.