कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने दि. ११ मार्चपासून शहरातील पर्यटनस्थळे आणि ऐतिहासिक स्मारके बंद केली आहेत. ८-९ महिन्यांचा लॉकडाऊन सोसल्यानंतर पुन्हा बसलेला हा फटका पर्यटन जगताला आता मात्र असह्य होत आहे. या क्षेत्रातील हजारो लोकांवर उपासमारीची वेळ आली असून, कुटुंब कसे चालवायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे.
शहरात होणाऱ्या गर्दीपेक्षा तर पर्यटनस्थळे निश्चितच सुरक्षित आहेत. त्यामुळे इतर व्यवसाय जसे सुरू ठेवण्यास परवानगी दिली, तशीच अटी आणि नियमांचे पालन करून आम्हालाही आमचा व्यवसाय करण्यास परवानगी द्या, असे आवाहन पर्यटन जगत करत आहे.
प्रतिक्रिया-
१. आम्हालाही पोट भरायचे आहे
अजिंठा - वेरुळसह शहरातील सर्वच पर्यटन स्थळांचा परिसर विस्तीर्ण आहे. दररोज पर्यटनस्थळी येणाऱ्या पर्यटकांची संख्या २०० पेक्षाही कमी असते. याठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे उत्तम पालन होऊ शकते. सध्या बाजारपेठ, मॉल, भाजी मंडई याठिकाणी दररोज होणारी गर्दी पाहता, यापेक्षा तर पर्यटनस्थळे निश्चितच सुरक्षित आहेत. मग केवळ आमच्यावरच हा अन्याय का? शासन आमच्यासाठी काही विशेष तरतूदही करत नाही. पर्यटन व्यावसायिकांनाही पोट भरायचे आहे, आम्हालाही घर चालवायचे आहे, हे शासनाने लक्षात घ्यावे आणि पर्यटनस्थळे पुन्हा सुरू करावीत.
- सय्यद अबरार हुसैन
टुरिस्ट गाईड
२. पर्यटनावर दूरगामी परिणाम
मॉल, बाजार, हॉटेल्स, रेस्टॉरंट सारे काही अटी आणि नियमांसह चालू आहे. मग केवळ पर्यटन स्थळांमुळेच काय बिघडते? इतरांप्रमाणे आम्हीही पूर्ण काळजी घेऊन आणि अटी, नियम पाळून व्यवसाय करू. जिल्हा प्रशासनाच्या अशा धोरणामुळे शहराच्या पर्यटनाची ‘निगेटिव्ह पब्लिसिटी’ होत आहे. याचा शहराच्या पर्यटनावर दूरगामी परिणाम होऊन मोठा फटका बसत आहे. यामुळे शहर पर्यटनाच्याबाबतीत १५ - २० वर्षे मागे फेकले जात आहे.
- जसवंतसिंह
पर्यटन व्यावसायिक