स. सो. खंडाळकर
औरंगाबाद : कोरोनाने साऱ्या जगाला हादरवून सोडले. साऱ्या जगाचीच अर्थव्यवस्था कोलमडून गेली. अनेक उद्योगधंदे बंद पडले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. एकीकडे हे चित्र असतानाच कोरोनाने खूप काही चांगल्या गोष्टी शिकवल्या. कमी खर्चात, कमी गरजांमध्ये जगता येते हेही कोरोनाने शिकविले. किचनपासून कटिंगपर्यंत खर्चकपात झाली.
कोरोनाने अनेक चांगल्या गोष्टी शिकवल्या...
कमी खर्चात, कमी लोकांमध्ये लग्न करता येते
मामा असला-नसला, आई-वडील असले-नसले तरी लग्न होऊ शकते
घरच्या अन्नाची चव कळली
स्वच्छ राहायला शिकवले कोरोनाने
कायम नोकरी एकच... ती म्हणजे शेतकऱ्यांची. बाकी नोकऱ्या बंद पडू शकतात. शेतीव्यवसाय बंद पडू शकत नाही.
...................................
कोरोनामुळे टूरचा खर्च वाचला
शॉपिंगचा खर्च वाचला
घरी महिलांच्या पाककलेला वाव मिळाला
हॉटेलिंगचा खर्च वाचला
सलून बंद राहिल्याने आत्मनिर्भर बनून पुरुषांना स्वतःच दाढी-कटिंग करावी लागली, तो खर्च वाचला.
.................................
हॉटेलिंगचा खर्च वाचला..
कोरोना नसताना सारखा सारखा हॉटेलिंगवर खर्च व्हायचा. कोरोनामुळे या खर्चाला नक्कीच आळा बसला. कारण हॉटेल्सच बंद आहेत. घरातल्या घरात खाणे जरूर वाढले. महिलांच्या पाककलेला यानिमित्ताने वाव मिळाला.
- क्रांती कुळकर्णी-देशमुख, मनपा शिक्षिका
........................................
पैसा सांभाळून खर्चाची लागली सवय
कोरोनामुळे सर्वांवरच मोठे आर्थिक संकट आले. सर्वांचेच बजेट कोलमडले. आहे त्या पैशात, काटकसर करीत जगण्याची सवय कोरोनामुळे लागली. २०२० साली तर ज्यांचे पोट हातावर आहे, त्यांना मदतीचा हात द्यावा लागला. कोरोनाने काटकसरीची सवय लावली तरी महागाई काही सुधरू देत नाही. गॅसचे भाव दिवसेंदिवस वाढतच आहेत.
- सुमित्रा गावंडे पाटील, सामाजिक कार्यकर्त्या