संतोष हिरेमठ
औरंगाबाद : औरंगाबादेतील घाटी रुग्णालयातील आयसीयूतील माॅनिटर कोरोना पाॅझिटिव्ह आला...तुम्ही म्हणाल काहीही..पण हो...कोरोना टेस्ट फक्त संशयित रुग्णांची म्हणजे माणसांचीच होते, असा समज असेल. मात्र, खबरदारी म्हणून घाटीत वाॅर्ड, आयसीयूतील ६० ठिकाणांहून घेण्यात आलेल्या नमुन्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. या तपासणीत फक्त एका माॅनिटरच्या सरफेसवर कोरोनाचा विषाणू आढळून आला.
कोरोनाने १४ महिन्यांपासून थैमान घातले आहे. साधी सर्दी झाली, खाेकला जाणवला की कोरोनाचा संशय व्यक्त केला जातो. तेव्हा कोरोना झाला की नाही, याचे निदान होण्यासाठी संशयित रुग्णाचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात येतो. अँटिजन टेस्ट आणि आरटीपीसीआर तपासणीद्वारे संशयित पाॅझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, याचे निदान केले जाते. हीच पद्धत आता रुग्णालयातील वॉर्ड, आयसीयू आणि रुग्णांच्या उपचारात वापरण्यात येणाऱ्या वैद्यकीय उपकरणांसाठी राबविली जात आहे. रुग्णांना उपचारादरम्यान खोकला, शिंकाचा त्रास असतो. त्यामुळे कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असताना वॉर्डातील विविध वैद्यकीय उपकरणांवर, फरशीवर कोरोनाचे विषाणू पसरण्याची भीती असते. यादृष्टीने रुग्णालयांत स्वच्छतेवर सर्वाधिक भर दिला जातो. यापूर्वी ऑपरेशन थिएटरचे (ओटी) वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात येत असे. एखादा संसर्गित रुग्ण आला तर ओटी बंद करून निर्जंतुकीरण, तपासणी केली जाते. कोरोना प्रादुर्भावात अगदी असेच वॉर्ड, आयसीयूच्या बाबतीत खबरदारी घेतली आहे. घाटी रुग्णालयाने ६० ठिकाणचे नमुने घेत त्यांची कोरोना तपासणी केली. तेव्हा त्यात केवळ एका उपकरणाचा अहवाल कोरोना सकारात्मक आला. व्हेंटिलेटर कोरोना निगेटिव्ह आल्याचेही घाटी प्रशासनातर्फे सांगण्यात आले. अशाप्रकारे खासगी रुग्णालयांमध्येही तपासणी होत असल्याचे सांगण्यात आले.
आरटीपीसीआर तपासणी
आयसीयू, वॉर्डातून ६० नमुने गोळा करण्यात आले होते. सर्व नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. फक्त एका आयसीतील माॅनिटर क्रमांक-२ पाॅझिटिव्ह आला. व्हेंटिलेटर निगेटिव्ह आला आहे. स्वच्छतेवर भर दिला जात आहे. यात आरटीपीसीआर तपासणीच करण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिक माहिती लवकरच दिली जाईल.
-डाॅ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी)